पुणे
देशात नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत अनेक मतदारसंघासाठी अटीतटीच्या लढती झाल्या. परंतु संपूर्ण महाराष्ट्राचे व देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली. त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला.
निवडणुकीपूर्वी पुरंदरचे माजी आमदार व महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी अपक्ष म्हणून बारामती लोकसभा निवडणूक लढवणार असे म्हणून बंड पुकारले होते. त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता. व निवडणूक लढवण्यावर ठाम होते. परंतु मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थी नंतर त्यांचे बंड थांबले. व या ठिकाणी महायुतीकडून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर झाली. परंतु या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
आता निकालानंतर विजय शिवतारे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. बारामतीची जागा अपक्ष म्हणून मी 1000% जिंकली असती असे नुकतेच विजय शिवतारे यांनी म्हटले. बारामती लोकसभा मतदारसंघात कुठला पक्ष नाही तर फक्त दोनच मतप्रवाह होते. ते म्हणजे पवार प्रो व पवार विरोधी.
तब्बल पाच लाख ऐंशी हजार मतदान हे असे होते की त्यांना ह्या दोन्ही पवारांना मतदान करायचं नव्हतं. या मतदारांना मतदानाची संधी द्यावी म्हणून लोकशाहीतील पवित्र काम मी करतोय असं मी बोललो होतो. मी कोणाच्या विरोधात नव्हतो असंही विजय शिवतारे यांनी म्हटले आहे.