३१ जुलै २०२१ पर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची महत्त्वाची आणि मोठी घोषणा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी आज विधानसभेत केली. एमपीएससीचा विद्यार्थी स्वप्निल लोणकरच्या आत्महत्या प्रकरणावर बोलत असताना अजितदादा म्हणाले की, ही घटना अतिशय वेदनादायी अशी आहे. अशी घटना कुणासोबतच घडू नये, या मताचे राज्य सरकार आहे. कालच मंत्रिमंडळ बैठकीत यासंबंधी चर्चा करण्यात आली. अशी वेळ कोणत्याही विद्यार्थ्यावर येऊ नये, यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल. तसेच स्वप्निल लोणकरच्या कुटुंबाला आर्धिक मदत देण्यासंदर्भात राज्य सरकार सकारात्मक आहे. सरकार लोणकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे अजितदादा यांनी सांगितले.
दरम्यान एससीबीसी आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. त्यामुळे एमपीएससीच्या सर्व भरती थांबवाव्या लागल्या होत्या. त्या अनुषंगाने मुख्य परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखतीही थांबवाव्या लागल्या, अशी माहिती ना. अजितदादा यांनी दिली. तसेच मधल्या काळात एमपीएससी या स्वायत्त संस्थेने कोरोनाचे कारण देऊन काही जागांच्या परीक्षा अचानक रद्द केल्या होत्या. त्यात राज्य सरकारने हस्तक्षेप करुन अशाप्रकारे परीक्षा रद्द करु नये, असे सांगितले असल्याचे ते म्हणाले.
स्वप्निलच्या आत्महत्येचा विषय मंत्रिमंडळाने गांभीर्याने घेतला असून ३१ जुलै २०२१ पर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार आहोत. विद्यार्थ्यांच्या मनात जै नैराश्य आले आहे त्याबाबत राज्य सरकार गंभीरपणे विचार करत आहे. कोरोना काळात ज्याप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रातील जागा भरल्या गेल्या तशाच एमपीएससीमधील जागादेखील भरल्या जातील. मला राज्यातील तरुण तरुणींना सांगायचे आहे की, राज्य सरकार भरतीसाठी आग्रही आहे. मात्र सुप्रीम कोर्टाचे निर्देश पाळून मार्ग काढायचे असतात. राज्य सरकार त्यातून मार्ग काढत आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना आश्वस्त केले.