पुणे
स्वारगेट एसटी डेपोतील तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेतील आरोपी दत्तात्रय गाडे याला पुणे पोलिसांनी मध्यरात्री 1 वाजता शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून अटक केली आहे. पोलिसांनी युद्धपातळीवर शोधमोहीम राबवत त्याला शिताफिने ताब्यात घेतले.घटनेनंतर आरोपी गुनाट गावातील शेतात लपून बसला होता. पोलिसांनी ड्रोन्स, श्वानपथक आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली. अखेर मध्यरात्री 1.10 वाजता पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
पोलिस कोठडीत नेल्यानंतर गाडेने भावनिक होऊन ‘माझं चुकलं, मला माफ करा’ असं म्हणत कबुली दिली. मात्र, त्याने एका मोठ्या दाव्याने खळबळ उडवली ‘मी अत्याचार केले नाहीत, हे संबंध परस्पर सहमतीने झाले,’ असा दावा त्याने पोलिसांसमोर केला आहे.स्वारगेट पोलिस आणि गुन्हे शाखेच्या 500 अधिकाऱ्यांनी आरोपीला शोधण्यासाठी मोठी मोहीम उभी केली होती. ग्रामस्थांनी पोलिसांना सहकार्य करत आरोपीच्या हालचालींवर लक्ष ठेवले.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, ‘गेल्या तीन दिवसांपासून आरोपीच्या शोधासाठी श्वान पथक, ड्रोन आणि मोठ्या प्रमाणावर पोलीस फौज तैनात करण्यात आली होती. ग्रामस्थांचाही या मोहिमेत मोठा सहभाग होता. अखेर, मध्यरात्री आरोपीला पकडण्यात यश आले आणि त्याची अटक प्रक्रिया पूर्ण करून आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.
’गुरुवारी रात्री साडेदहा वाजता दत्तात्रय गाडे नातेवाईक महेश बहीरट यांच्या घरी आला. त्याने नातेवाईकांकडून पाण्याची बाटली घेतली आणि तिथेच गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर, तो नातेवाईकांच्या घराच्या परिसरात असलेल्या एका बेबी कॅनॉलमध्ये झोपला.तिथेच तो ग्रामस्थांना आढळला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर लागलीच गाडीमध्ये बसवले आणि पुण्याच्या दिशेने घेऊन जाण्यास सुरुवात केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी गाडीतच त्याची चौकशी सुरू केली.