सासवड
करोना स्थिती निवळू लागल्याने छोटे मोठे व्यवसायिकांना काहीसे अच्छे दिन येऊ लागले आहेत. मात्र सध्या सासवड शहरासह ग्रामीण भागात विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.
त्याचा फटका शेती, उद्योग, व्यवसायांसह विद्यार्थी, दवाखाने आदी सर्वच घटकांना बसत आहे. या पार्श्वर्भूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सासवडच्या विद्युत वितरण कार्यालयातील कार्यकारी अभियंता अरविंद दिनकर वनमोरे यांना गांधीगिरी मार्गाने निवदेन देऊन कैफियत मांडण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष व स्व एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप, निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भानूकाका जगताप, तालुका राष्ट्रवादी उपाध्यक्ष संदिप चिकणे, नगरसेवक दिपक टकले, जिल्हा मागासवर्ग सेलचे दत्ता राऊत, कुंभारवळणचे माजी सरपंच सचिन पठारे आदींनी यावेळी शाल श्रीफळ, पुस्तक देत वनमोरे यांचा सत्कार केला. विद्युतपुरवठा सुधारावा अशी मागणी यावेळी संबंधितांनी केली.
काही दिवसात सुधारणा न झाल्यास वेगळ्या मार्गाने आंदोलन केले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. अभियंता वनमोरे यांनीही विद्युत पुरवठ्यात सुधारणा करण्याचे आश्वासन दिले.