पुणे
राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत असताना, पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिवंगत पतीची पेन्शन हवी तर किस दे अशी मागणी एका महिलेकडे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याने केल्याचा आरोप महिलेने केला आहे. याबाबत महिलेने जिल्हा परिषदेकडे तक्रार दाखल केली आहे. माहितीनुसार संबधित कर्मचारी हा आरोग्य विभागात कामाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये पूर्वी कार्यरत असलेल्या आपल्या दिवंगत पतीच्या पेन्शन घेण्यासाठी तक्रारदार विधवा महिला आली होती. यावेळी जिल्हा परिषदेत उपस्थित असलेल्या एका कर्मचाऱ्याने या महिलेला पेन्शन मिळवून देण्यासाठी चक्क किसची मागणी केली. असा आरोप महिलेनं केला आहे.
इतकंच नाही तर, पतीची पेन्शन घेण्यासाठी आपण अनेकवेळा चकरा मारल्या असल्याचंही तक्रारदार महिलेनं सांगितलं आहे. प्रत्येक वेळी पुन्हा येण्याचे सांगत कर्मचाऱ्यांनी पेन्शन देण्यास टाळाटाळ केली. यावेळी आल्यानंतर कर्मचाऱ्याने किस दे अशी मागणी केली असल्याचा आरोप तक्रारदार महिलेनं केला आहे.
या प्रकाराने घाबरलेल्या, महिलेने मुख्य कार्यकारी आयुष प्रसाद यांच्याकडे याबद्दलची तक्रार केली. दरम्यान, तक्रार प्राप्त होताच या कर्मचाऱ्याला चौकशी होईपर्यंत निलंबित देखील करण्यात आलं आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी विशाखा समितीकडे वर्ग करण्यात आली आहे.