पुरंदर
पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागात आंबळेत असणारे जागृत श्री क्षेत्र ढवळेश्वर या ठिकाणी श्रावणातल्या पहिल्याच सोमवारी हजारो भाविकांनी दर्शन घेतले.
पुरंदर तालुक्याच्या पूर्वेस ऐतिहासिक वारसा लाभलेले आंबळे गाव.या ठिकाणी असणारे पेशवेकालीन वाडे हे पर्यटकांचे मन लोभावतात. या गावात जागृत असणारे दोन तीर्थक्षेत्रे.यापैकी एक म्हणजे गावचे ग्रामदैवत असणारे श्री भैरवनाथ व दुसरे म्हणजे श्री क्षेत्र ढवळेश्वर.
ढवळेश्वर मंदिर म्हणजे इतिहासात नोंद असणारा ढवळगड.या गडावरील ढवळेश्वर मंदिर हे पांडवकालीन असल्याने एक जागृत असे देवस्थान आहे.याठिकाणी भलेमोठे असे शिवलिंग आहे या शिवलिंगाची उंची अंदाजे अडीच ते तीन फूट उंच रुंदी दोन ते अडीच फूट व लांबी चार ते साडेचार फुटांची आहे.
याठिकाणी पाण्याच्या दोन टाक्या आहेत या टाकीचे एक वैशिष्ट्य याठिकाणी उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तीनही ऋतूत या टाक्यांमध्ये जीवंत पाणी पाहावयास मिळते. या टाक्यांची एक आख्यायिका आहे की या टाकीत पूर्वीच्या काळी जर एक लिंबू टाकले तर ते भुलेश्वर या ठिकाणी असणाऱ्या पाण्याच्या टाकीत जात असे. या मंदिरात प्रवेश केल्यानंतर सुबक अशी नंदीची मूर्ती पाहावयास मिळते त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर भव्य शिवलिंग दिसते तेच श्री क्षेत्र ढवळेश्वर.
मंदिराच्या डाव्या बाजूला खोल अशी दरी दिसते त्या दरीत पावसाळ्यात झुळझुळ वाहणारे झरे पर्यटकांचे मन प्रसन्न करतात. मंदिराच्या डाव्या बाजूची आणखी एक खासियत आहे या बाजुला खोल दरी तर आहेच पण या ठिकाणावरून पुणे ते कोल्हापूर असा रेल्वे मार्ग आहे या ठिकाणी रेल्वे लाईन ला तीन बोगदे देखील आहेत मंदिराच्या डाव्या बाजूला उभे राहून रेल्वे जाताना पाहिले असता मनाला खूप मोठा आनंद मिळतो.
श्री क्षेत्र ढवळेश्वर या ठिकाणी वर्षातून दोन वेळा म्हणजेच महाशिवरात्र व श्रावण महिन्यात गावचे ग्रामदैवत असणारे श्री काळभैरवनाथ यांची कावड या ठिकाणी भेटीसाठी येत असते ही कावड भेटीसाठी जाताना खूपशा अवघड वाटेवरून(कड्यावरून) जाताना पाहिल्यानंतर अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो हा प्रसंग पाहताना अंगावर अक्षरशः शहारे येतात असे हे जागृत असणारे ढवळेश्वर मंदिर अर्थात इतिहास कालीन ढवळगड पाहण्यासाठी पर्यटकांची कायमच या ठिकाणी रेलचेल असते.