पुणे
एकट्या पश्चिम महाराष्ट्रात ७ लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा ओलांडलेल्या गुजरातच्या अमूल दूध संघाने दूध खरेदी दरात उडी घेतली आहे. सोलापूर जिल्ह्यातून दुधाची खरेदी करणाऱ्या साबरकंठा जिल्हा दूध संघाने गाय दुधाचा खरेदी दर ३८ रुपये ९६ पैसे दर केला आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील दूध संघापुढे पेच निर्माण झाला आहे. म्हैस दूध खरेदी दरातही वाढ केली आहे.
सध्या देशभरात दुधाची टंचाई आहे. दुधापासून तयार होणाऱ्या पावडर, बटर आणि इतर पदार्थाच्या किंमती वाढल्या आहेत. पावडर आणि बटरचे दर वाढल्याने दूध खरेदी दरातही वाढ होत आहे. राज्यातील आघाडीच्या सोनाई दूध संघाने २१ जानेवारीपासून गाय दूध खरेदी दरात एक रुपयाची वाढ केली आहे.सोनाईने गाय दूध खरेदी दर प्रति लीटर ३७ रुपये केल्यानंतर सोलापूर जिल्हा संघानेही दूध उत्पादकांना दरवाढ केली आहे.
आता इतर दूध संघांनाही शेतकऱ्यांना दरवाढ द्यावी लागणार आहे. असे असतानाच गुजरातमधील अमूल अखत्यारित साबरकंठा जिल्हा दूध संघाने गाय दूध खरेदीला प्रति लीटर ३८ रुपये ९६ पैसे दराचे दरपत्रक काढले आहे.