पुरंदर
गुंजवणी प्रकल्पाच्या जलवाहिनीचे तोंडल ता. पुरंदर येथील काम सुरू करण्याचे निर्देश जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिले आहेत. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी जयंत पाटील यांना प्रत्यक्ष भेटून काम चालू करण्याची विनंती केली. श्री. पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांना फोनवरून तत्काळ आदेश दिल्याची माहिती शिवतारे यांनी दिली आहे.
गुंजवणी प्रकल्प शिवतारे यांची निर्मिती मानली जाते. जलवाहिनीचे काम पूर्ण करून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोचावे यादृष्टीने शिवतारे प्रयत्नशील असतानाच आमदार संजय जगताप यांनी काम बंद करण्याबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले. त्यामुळे मागील दीड महिन्यापासून काम ठप्प आहे. लोकहिताच्या प्रकल्पात राजकीय बाधा आणण्याच्या प्रयत्नामुळे शिवतारे यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला होता. तशी नोटीस त्यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणांना बजावली होती.
दरम्यान याबाबत शिवतारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जयंत पाटील माझे अनेक वर्षापासूनचे मित्र आहेत. त्यांनी काम सुरू करण्याचे आदेश दिले असून लवकरात लवकर पुन्हा काम चालू होईल अशी आशा आहे. काम चालू न केल्यास आंदोलनाचा मार्ग आम्हाला कधीही खुलाच राहील.