पुणे
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा १४ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अपघाती मृत्यू झाला. मेटे यांच्या मृत्यूनंतर हा अपघात होता की घातपात होता असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या संदर्भात ३ ऑगस्ट रोजी मेटे यांच्या गाडीचा अनोळखी व्यक्तींनी पाठलाग केल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला होता. यावर आता पोलिसांनी तपास करत त्या चालकाची चौकशी केली आहे.
हा पाठलाग केवळ गैरसमजातून झाल्याचे त्या गाडीच्या मालकाने पोलिसांना सांगितले आहे. मेटेंच्या गाडीचा पाठलाग करणाऱ्या गाडीच्या मालकाची रांजणगाव पोलीसांनी चौकशी केली. या चौकशीत कार मालक संदिप वीर यांनी तो पाठलाग केवळ गैरसमजातून झाला असल्याचे सांगितले, अशी माहिती रांजणगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी दिली.
विनायक मेटे यांच्या गाडीचा पाठलाग केलेली गाडी रांजणगाव पोलीस हद्दीतली होती. मेटे यांच्या अपघातानंतर या संदर्भात बातम्या आल्यानंतर त्या कारचा मालक आणि त्यादिवशी गाडीत असणारे लोक स्वत:हून पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांनी त्यांचा जबाब नोंदवला.
त्यादिवशी माझ्या चुलत भावाचा वाढदिवस होता. त्यामुळे आम्ही शिरुरला गेलो. पण काही मित्रांनी आग्रह केला की तुम्ही परत घरी या त्यामुळे आम्ही घाई घाईने परत निघालो. स्पीडमध्ये आम्ही येत होतो. काही गाड्यांना ओव्हरटॅक केले. हॉर्न वाजवले म्हणून त्यांचा गैरसमज झाला असेल, अशी माहिती त्या गाडीचालकाने पोलिसांना दिली आहे.
विनायक मेटे यांच्या १४ ऑगस्टला पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवेवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. मराठा समन्वय समितीची बैठक होती. त्यासाठी ते मुंबईकडे जात होते. त्यांच्या गाडीला खोपली येथील बोगद्याजवळ अपघात झाला. त्यात ते गंभीर जखमी झाले होते.