औरंगाबाद
आहे तोच पती जन्मोजन्मी मिळावा,’ यासाठी वटपौर्णिमेला स्त्रिया वडाची पूजा करतात. मात्र कालौघात समाजात परस्परविरुद्ध परिस्थितीही निर्माण झाली आहे. ‘भांडखोर बायका सात जन्म नव्हे तर सात सेकंदही नको’ अशी प्रार्थना पत्नी पीडित पुरुषांनी एकत्र येत केली
औरंगाबाद येथील पत्नी पीडित आश्रमच्या सभासदांनी ही पिंपळ पौर्णिमा साजरी केली आणि पुरुषांच्या समस्यांकडेही लक्ष द्यावे अशी मागणी केली.काही महिला या आपल्या पतीला त्रास देतात. ज्या नवऱ्यांनी हा त्रास भोगला आहे त्यांच्या त्रासातून सुटका व्हावी यासाठी आम्ही हा कार्यक्रम करतो असं या आश्रमाचे संस्थापक भारत फुलारे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.”वटपौर्णिमा साजरी करण्याने सात जन्म लाभलेला पती मिळत असेल तर पिंपळ हा मुंजा आहे म्हणून आम्ही वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पिंपळ पूजन करतो व मुंजाला साकडे घालतो की “हे मुंजा आम्हाला अशा भांडखोर बायका देऊन मरण यातना देण्यापेक्षा कायमस्वरूपी मुंजा ठेव,” असं या निवेदनात म्हटले आहे.
पत्नीकडून होणाऱ्या त्रासाची दखल कायद्याने घ्यावी असं या संस्थेचं म्हणणं आहे. “अनेक पत्नी पीडित हे पत्नीच्या जाचाला कंटाळून व समाजात न्याय न मिळाल्याने हताश होऊन आत्महत्या करताना दिसत आहे हे NCRB अहवालावरून स्पष्ट होतं आहे. त्यामुळे लिंगभेद न करता कायदे तयार झाले पाहिजेत तसेच पुरुषांना देखील कायद्याचे संरक्षण दिलं गेलं पाहिजे,” अशी पत्नी पीडित आश्रम संस्थेची मागणी आहे.बीबीसी मराठीने गेल्या वर्षी या आश्रमावर बातमी केली होती. महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत वेगळी मतं मांडली होती.
रेणूका कड या महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आहे. महाराष्ट्रासह देशातील पाच राज्यांमध्ये त्या यासाठी काम करतात. त्यांनी यासाठी महिलांना दोष देणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.
महिलांना आजही आपल्या समाजामध्ये दुय्यम स्थान आहे. शिवाय अशा प्रकरणांत केवळ पुरुषांना त्रास होत नाही, तर दोघांनाही होतो. मुळात मुलीला किंवा महिलांना घरात बोलायचीही परवानगी नसते. हीच या सर्वाची सुरुवात असते,” असं रेणूका कड म्हणाल्या.”पुरुषांवर अत्याचार होतो, असा दावा केला जात असेल, तर नॅशनल क्राईम ब्युरोची आकडेवारी एकदा पाहायला हवी. त्याशिवाय यात नोंद नसलेल्या महिलांवरील अत्याचारांची संख्याही मोठी असू शकते.पितृसत्ता चुकीची तशी मातृसत्ताही चुकीचीच असते, त्यामुळं मानवता किंवा समतेच्या माध्यमातूनच अशा अडचणींवर योग्य पर्याय सापडू शकतो,” असं मत रेणूका कड यांनी मांडलं.
दरम्यान, कौटुंबिक वादाची प्रकरणं हाताळणाऱ्या काही वकिलांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर अशा प्रकरणांमध्ये महिलांकडून अधिकारांच्या गैरवापराचा प्रयत्न होत असल्याचं मान्यही केलं आहे.मात्र, कायदेतज्ज्ञांनी याबाबत बोलताना अत्यंत स्पष्टपणे भूमिका मांडली असून, महिला नव्हे तर पुरुषच महिलांना संरक्षण देणाऱ्या कायद्यांचा गैरवापर करतात हे स्पष्ट केलं आहे.
प्रत्यक्ष स्त्रीवर जो अन्याय होतो, त्यावर बोलायचं नाही अन्याय सहन करणं हाच स्त्रीचा दागिना आहे, असं तिला शिकवलं जातं. याला धर्म किंवा जातीचं बंधन नाही. त्यामुळं एका पातळीपर्यंत महिला अन्याय सहन करत असते, असं विधीज्ञ असीम सरोदे यांनी म्हटलं.
तक्रार करताना पोलिसांनी पतीला समज द्यावी एवढीच महिलेची इच्छा असते. पण तिला घराबाहेर केलं जातं तेव्हा तिला माहेरचाच आधार असतो. त्यावेळी माहेरचे नातेवाईक हा मुद्दा प्रतिष्ठेचा बनवतात. त्यातून कायद्याचा गैरवापर सुरू होतो. अशावेळी स्त्री पतीकडे परत जाऊ शकत नाही. शिवाय माहेरचे ऐकत नाहीत, त्यामुळं स्त्रीची त्यातून मुकसंमती तयार होते,” असं ते म्हणाले.
पोलिसांत तक्रार देताना 498 ची तक्रार देण्याचा सल्ला देणारेही पुरुषच असतात. वकिलांकडून अशा प्रकारचा सल्ला दिला जातो. बहुतांशवेळा ते पुरुष वकील असतात. त्यानंतर पोलिसांत अटक कोणाला करायची याचं राजकारण सुरू होतं त्यातही पुरुष पोलिसांचा समावेश असतो.
या सर्वामध्ये महिला शक्यतो कुठेच नसतात. त्यामुळं गैरवापर करणारे कोण आहे, हे स्पष्ट होतं, असं सरोदे यांनी सांगितलं.”2005 मध्ये आलेला कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा फौजदारी स्वरुपाचा नाही. तो समज देण्यासाठीचा कायदा आहे. तरीही याअंतर्गत प्रकरणं दाखल न होता 498 चा वापर होतो. दिवाणी स्वरुपाचा, समज देऊन आपसांत भांडणं मिटवणारा कौटुंबीक हिंसाचाराचा कायदा वापरून अशी प्रकरणं अधिक हाताळली जावी.”
आपसांत संवादातून मार्ग काढताना कोणाच्याही अधिकारांचा, हक्काचा बळी जाणार नाही, याची काळजी घ्यावी. प्रत्येकवेळी महिलांनी हक्क का सोडायचा. त्यामुळं पुरुषप्रधान संस्कृती कुठे चुकचे यावर अधिक चर्चा होणं गरजेचं असल्याचं असीम सरोदे यांनी म्हटलं.