पिंपरी-चिंचवड
राज्यात कोरोना विषाणू आणि तसंच ओमिक्रॉन व्हेरियंटचा प्रादुर्भाव वाढत आहे. दरम्यान, ओमिक्रॉनचा धोका कमी असल्याचं सांगितलं जात होतं. अशावेळी देशात आणि राज्यात ओमिक्रॉनचा पहिला बळी गेल्याची माहिती मिळतेय.
पिंपरी-चिंचवडमध्ये वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा 28 डिसेंबर रोजी मृत्यू झाला होता. त्या रुग्णाला ओमिक्रॉनची लागण झाली होती असा अहवाल आज आला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात आज ओमिक्रॉनचे 3 नवे रुग्ण आढळून आले आहेत. या तीन रुग्णांपैकी दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या तीन रुग्णांपैकी एकजण नायजेरियातून आलेला आहे.
अन्य दोघे ते त्या रुग्णाचे निकटवर्तीय आहेत. यातील नायजेरियातून आलेल्या रुग्णाचा 28 डिसेंबरला वायसीएम रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
त्या रुग्णाचा तपासणी अहवाल आज प्राप्त झाल्यानंतर त्याला ओमिक्रॉनची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. तर उर्वरित दोन नवे रुग्ण हे भुसावळमध्ये उपचारासाठी दाखल असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतेय.
सदर व्यक्ती नायजेरियातून 12 डिसेंबरला आली होती. 17 डिसेंबरला त्यांना छातीत त्रास जाणवू लागला. म्हणून त्यास परदेशी रुग्णांसाठी राखीव असणाऱ्या भोसरी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी तपासात हृदय विकाराचा सौम्य धक्का असल्याचं तपासात निष्पन्न झालं.
मग पुढील उपचारासाठी वायसीएम रुग्णालयातील रुबी एलकेअर कार्डियाक सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. तेथे उपचार सुरू असतानाच त्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणंही जाणवू लागली. म्हणून कोरोनाची चाचणी केली असता, अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर ओमिक्रॉन चाचणीसाठी नमुने देण्यात आले.
अहवाल प्रतीक्षेत असतानाच संबंधित रुग्णाची तब्येत सुधारली होती. पण 28 डिसेंबरला पुन्हा हृदय विकाराचा झटका आला आणि त्यात ती व्यक्ती मृत्यू पावली, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
एकीकडे कोरोना रुग्णांची मोठी वाढ होत असताना राज्यात ओमिक्रॉनचा फैलावही मोठ्या प्रमाणात होत असल्याचं आता पाहायला मिळत आहे. कारण, राज्यात आज ओमिक्रॉनचे तब्बल 198 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
त्यापैकी एकट्या मुंबईत 190 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे. तर ठाण्यात 4 रुग्ण आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत 450 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे, तर 125 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे.