पंढरपूर
सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून लंडन येथील एका महिने सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील एका शिक्षकाला 12 लाख 40 हजार रूपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सध्य़ाच्या काळात सर्वच वयोगटातील लोक आपला वेळ सोशल मीडीयावरती घालवत असतात. याच सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जणांची फसवणूक झाल्याच्या घटना देखील समोर येत आहेत.
सोशल मीडियावर खोटी आयडी तयार करुन लोकांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून पैशांची मागणी केल्याची अनेक प्रकरण समोर असतानाच आता थेट पंढरपूर ते लंडन अशी फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे
लंडन मधील युनायटेड किंग्डम येथील एलिझाबेथ स्मिथ नामक महिलेने प्रेमाचा बहाना करून सांगोला येथील शिक्षक नागनाथ दुधाळ यांना लाखो रूपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी दुधाळ यांनी संबंधित महिले विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागनाथ भिमराव दुधाळ या शिक्षकाची डिसेंबर 2021 मध्ये फेसबुकवर लंडन मधील स्मिथ नावाच्या महिलेशी मैत्री झाली. त्यानंतर स्मिथ नामक या महिलेने फिर्यादी नागनाथ दुधाळ या शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून गिफ्ट व पौंड स्वरूपात असलेला चेक पाठविण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेळोवळी 12 लाख 40 हजार रूपयांना गंडा घातला आहे.
फिर्यादी शिक्षकाने पैसे पाठवल्यानंतर त्यांचा कोणताही संपर्क झाला नाही. याबाबत नागनाथ भिमराव दुधाळ रा. वासुदरोड दत्तनगर, सांगोला यांनी अनोळखी महिलेविरुद्ध सांगोला पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असल्याची माहिती सांगोला पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे.