सोलापूर
आठ दिवसांवर लग्न असताना कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याचा वीजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याची घटना सोलापूरमध्ये घडली आहे. निलेश राजेंद्र होनराव असे या २६ वर्षीय कर्मचाऱ्याचं नाव आहे. रोहित्र दुरुस्त करताना विजेचा झटका बसून निशेशचा जागीच मृत्यू झाला. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील मालवंडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये रोहित्रात बिघाड झाली होती. त्यामुळे ही बिघाड दुरुस्त करण्यासाठी महावितरणमध्ये कार्यरत असलेला कर्मचारी निलेश राजेंद्र होनराव गेला. पण काळाने घात केला.
रोहित्र दुरुस्त करत असताना विजेचा झटका लागून निलेशचा जागीच मृत्यू झाला. विद्युत रोहित्रावर निलेशचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने अख्ख गाव सुन्न झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निलेश होनराव हा तरूण गेल्या एक वर्षांपासून महावितरणच्या सुर्डी विभागात कार्यरत होता. मालवंडी गाव आणि परिसरात त्याने महावितरणची कामे करून स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली होती. निलेशचं लग्न देखील ठरलं होतं.
नुकताच एक महिन्यापूर्वी त्याचा साखरपुडा झाला होता आणि आठ दिवसांवर त्याचा विवाह आला होता. परंतु विवाहाच्या आठ दिवस आधीच त्याच्यावर काळाने घाला घातला. निलेशच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबासह मालवंडी गावावर शोककळा पसरली आहे. या बातमीने संपूर्ण बार्शी तालुका सुन्न झाला आहे.