पुणे
भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. संतोष कोलते असं या पदाधिकाऱ्याचं नाव आहे. ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा आता पुण्याच्या राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.
सोशल मीडियावर सर्वच पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं आपल्या पक्षाची बाजू मांडण्याचं काम करत असतात. अशावेळी टीका करण्याच्या ओघात अनेकदा वाद ओढवून घेतला जातो. भाजपकडून सध्या ‘महाविकास आघाडीचं काम दाखवा आणि 30 हजार रुपये मिळवा’, अशी ऑफर देण्यात आली आहे. शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी ही ऑफर दिल्यानं अर्थातच त्याच्या बातम्याही झाल्या.
दरम्यान, मुळीक यांच्या अशाच एका बातमीवर कुणीतरी आपले उधारीचे पैसे बाकी असल्याची आणि ते लवकरात लवकर द्यावेत, अशी कमेंट केली होती. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ही बातमी आणि त्याखाली असलेल्या कमेंटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल केला. या पोस्टमुळे जगदीश मुळीक यांची बदनामी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी संतोष कोलते यांच्या विरोधात विनित वाजपेयी यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्याबद्दल आक्षेपार्ह बदनामीकारक आशय लिहून त्यांना जाणिवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं लेखी तक्रारीमध्ये म्हटलंय.