पुणे
राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार जाहीर करण्याची प्रक्रिया जवळपास अंतिम टप्प्यात असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रारंभ झाला आहे.अर्ज दाखल करण्यास मंगळवार २९ पर्यंत केवळ तीन दिवस उरले आहेत. पुरंदर तालुक्यातून महाविकास आघाडीच्या वतीने विद्यमान आमदार संजय जगताप यांची अपेक्षेप्रमाणे उमेदवारी जाहीर झाली आहे. तर महायुतीच्या वतीने माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे निवडणुकीचा शड्डू ठोकलेले माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांच्यासह भाजपचे गंगाराम जगदाळे कोणता निर्णय घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आमदार संजय जगताप यांची उमेदवारी जाहीर होणार हे सुरुवातीपासूनच निश्चित होते. मात्र यावेळी आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी महाविकास आघाडीचे घटक पक्षातील राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे नेते माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी जोरदार तयारी सुरु केली होती. शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यावेळोवेळी भेटीगाठी घेवून वेगवेगळ्या मार्गाने उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न केला आहे.
त्याचबरोबर तालुक्यात कार्यकर्ते मेळावे, पत्रकार परिषदा घेवून त्या माध्यमातूनही वरिष्ठ नेत्यांपर्यंत आपल्या भावना पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र एकट्या पुरंदरचा विचार न करता राज्यातील महाविकास आघाडीचे हित लक्षात घेवून आमदार संजय जगताप यांची अखेर अपेक्षेप्रमाणे उमेदवारी जाहीर केली.महायुतीच्या वतीने माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांची अधिकृत उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र उमेदवारी त्यांनाच मिळणार असल्याची खात्री असल्याने शिवतारे यांनी निवडणुकीची पूर्ण तयारी केली आहे.
तसेच सोमवारी २८ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख जाहीर केली आहे. एकीकडे शिवतारे यांची जोरदार तयारी सुरु असताना महायुतीमधीलच भाजप या घटक पक्षाचे गंगाराम जगदाळे हेही निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्याचवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस मधून जिल्हा बँकेचे चेअरमन डॉ. दिगंबर दुर्गाडे हेही अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहेत.
महायुतीमधील चढाओढ सुरु असल्यानेच विजय शिवतारे यांची उमेदवारी जाहीर करण्यास विलंब होत आहे. मात्र डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी पक्षाच्या आदेशावरून माघार घेतली तरी गंगाराम जगदाळे कोणती भूमिका घेणार हेही शिवतारे यांच्यासाठी महत्वाचे ठरणार आहे.महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार संजय जगताप मंगळवारी दि. २९ रोजी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्यासाठी जोरदार तयारी सुरु आहेत.
मागील आठवड्यात त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा घेतल्यानंतर उमेदवारी मिळविण्यासाठी मुंबईत तळ ठोकून आहेत. मात्र झेंडे यांना पक्षाने उमेदवारी पूर्णपणे नाकारली असल्याने आता कोणती भूमिका घेणार ? पक्ष नेतृत्वाला आणि महाविकास आघाडीला आव्हान देत अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार का ? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
पक्षनेत्यांना उमेदवारीसाठी कित्येक दिवस गळ घातल्यानंतर उमेदवारी नाकारल्याने दुखाविलेले माजी सनदी अधिकारी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे दिसून येत आहे. तसे झाल्यास त्यांची उमेदवारी सर्वांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. महाविकास आघाडीतील पदाधिकारी केवळ आघाडी म्हणून राहण्याची शक्यता असून पक्षातील कार्यकर्त्यांचा मोठा संच त्यांच्यासोबत दिसून येत आहे.