पुरंदर
गुळुंचे (ता.पुरंदर) येथील तालुक्यातून पाहिले थेट मतदारातून निवडून आलेले सरपंच संभाजी कुंभार व सदस्य विकास भंडलकर यांना अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांनी घरचा रस्ता दाखवला.
सरपंच व सदस्यांचे अपील अमान्य करत दोघांना आयुक्तांनी अपात्र ठरवले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अपत्रतेच्या निकालाची नामुष्की सांसद आदर्श ग्रामच्या सरपंच व सदस्यावर ओढवली आहे.
गुळुंचे गावात या पंचवार्षिक निवडणुकीत सत्तापरिवर्तन झाले. तत्कालीन सांसद आदर्श ग्रामचे समन्वयक सुरेश जगताप यांच्या जवळच्या मंडळींनी त्यांची साथ सोडून दुसऱ्या गटात प्रवेश केला होता.
निवडणुकीनंतर गावातील ग्रामस्थ अक्षय निगडे, स्वप्नील जगताप व नितीन निगडे यांनी सरपंच संभाजी कुंभार यांच्या आई द्वाराकबाई कुंभार व सदस्य विकास भंडलकर यांचे वडील दादा भंडलकर यांचे सरकारी गायरान जागेत अतिक्रमण असल्याने त्यांना पदावरून अपात्र करण्याची मागणी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे केली.
दरम्यानच्या काळात कोरोना साथीच्या दोन लाटा येऊन गेल्याने प्रकरणाला विलंब लागला. डॉ.देशमुख यांनी सरपंच कुंभार व सदस्य विकास भंडलकर यांना अपात्र करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाने व्यथित होऊन सरपंच व सदस्यांनी अतिरिक्त विभागीय आयुक्तांच्या न्यायालयात पाहिले अपील दाखल केले होते.
गायरान जागेत केवळ सरपंच व एका सदस्याचे नाही तर १५२ अतिक्रमणे आहेत. या पाच वर्षात अजून अतिक्रमणे वाढली आहेत. गावाचा कारभार कायद्याप्रमाणे नाही तर मनमानी पद्धतीने केला गेला आहे. याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. जोवर संपूर्ण ग्रामपंचायत बरखास्त होऊन संबंधितांना शिक्षा होत नाही तोवर स्वस्थ बसणार नाही. गावकऱ्यांच्या हितासाठी की स्वतःच्या फायद्यासाठी ग्रामपंचायत आहे हेच कळत नाही : नितीन व अक्षय निगडे, ग्रामस्थ, गुळुंचे.
त्यावर सुनावणी आयुक्तांनी होऊन सरपंच व सदस्य यांना अपात्र ठरवत जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे आदर्श ग्रामच्या सरपंचांना पुन्हा एकदा नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे.
दरम्याण, अक्षय निगडे व इतरांनी आर्थिक अनियमितता, गायरान जागेतील अतिक्रमणे व इतर २६ मुद्द्यांवर ग्रामपंचायत बरखास्त करण्याची मागणी विभागीय आयुक्तांकडे केली होती.
यावर तक्रारदारांचा अर्ज अमान्य केल्याने त्यांनी ग्रामविकास मंत्रालयात अपील दाखल केले आहे. दरम्यान, या तक्रार अर्जातील मुद्दा क्रमांक ६ व ७ हा सरपंच व सदस्य यांच्या अतिक्रमांच्या संदर्भात असल्याने व त्यावरील निकाल लागल्याने तक्रारदारांचे अपील मान्य होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात पुन्हा एकदा सत्तासंघर्ष पाहायला मिळणार आहे.
गावाच्या विकासाचे काय ?
किरकोळ वाद दोन्ही गटांनी एकत्र येऊन समजूतदारपणा दाखवून मिटविणे आवश्यक होते. कारखान्याच्या संचालकपदाच्या निवडणुकीत गाव एका सतरंजीवर येते मात्र, नंतरच्या काळात पुन्हा हेवेदावे वाढत असल्याने याचा परिणाम गावाच्या विकासावर होत आहे. दुसरीकडे चुकीची व न्यायविसंगत कामे करणाऱ्यांना शिक्षा ही व्हायलाच हवी असे मत गावातील जाणकारांनी व्यक्त केले.