पुरंदर
पुरंदर तालुक्यातील काही गावांमधून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्याबाबत महसुल व कृषी विभाग उदासीन असल्याचे चित्र आहे. परंतु प्रशासन पातळीवर ‘पंचनाम्याची चेष्टा झाली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य सदस्य व शेतकरी कांचन निगडे यांनी केला असून त्यांनी याबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पत्र पाठवले आहे.
कांचन निगडे यांनी मा. अजित पवार यांना पाठवलेल्या पत्रात म्हंटले आहे की, एक महिना उलटून गेला तरी अजून पंचनामे बाकी आहेत .वास्तविक सरसकट नुकसानभरपाई फॉर्म भरून घेणे आवश्यक असताना तोंड बघून पंचनामे दिशाभूल करणारे वाटतात.
त्यात महसूल व कृषी विभागाच्या पातळीवरील निरुत्साही भावना शेतकऱ्यांना अडचणी वाढवणारी ठरते आहे. यांचे कर्मचारी कधी रजेवर,कधी दुसऱ्या कामात अडकल्यावर पंचनामा होई पर्यंत लोकांनी शेत मशागत करायचं थांबायचं का ? अजून नवरात्र मध्ये पडणारा पाऊस बाकी आहे ,ते नव्यानं नुकसान वेगळंच होणार असताना आत्ता काही क्षेत्रातून ओढ्या सारखं पाणी वाहून गेलं, आज रोजी ते पाणी आटून गेलं,मग वास्तव पाहणीत पाणी नाही, लहान ऊस हिरवा दिसतो ते क्षेत्र टाळणे योग्य आहे का ? त्या उसाला ऊन पडलं की करपा होणार आहे ,मूळ कुज होणार आहे,फुटवे कुजून गेले, ऊस एक शिवडी गेला हे नुकसान ए सी मध्ये बसून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना कसं कळणार ? राज्य व जिल्हाधिकारी पातळीवर संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्या सरसकट नुकसान भरपाई फॉर्म भरून त्वरित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई खात्यावर वर्ग करा .
दादा सभा कोणी कुठं घ्यायची यातच माध्यमं व लोकप्रतिनिधी अडकून पडलेत मुख्यमंत्री यांना दिल्ली वारी सुटेना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही तुम्हीच शेतकऱ्यांना न्याय देऊ शकता,दादा आपण लक्ष घाला,शेतकऱ्यांची छोटी मोठी पिकं पुर्णतः नष्ट झालीत त्यांचं सरसकट पीक कर्ज माफीची मागणी करा असे पत्रात नमूद केले आहे.