पुरंदर
नीरा येथील वार्ड नंबर एक मध्ये रेल्वेच्या हद्दीत गेली चाळीस वर्षांनहून अधिक काळ राहणाऱ्या गोर-गरिबांची पक्की घरे व झोपड्यावर बुधवारी रेल्वेच्या अतिक्रमण विभागाने बुलडोझर फिरवला. कोणाचाही मुलाहिजा न बाळगता पत्यांच्या घरांप्रमाणे घरे पाडली.त्यामूळे याठिकाणी राहणाऱ्या लोकांना हताशपणे घरे पडताना पाहण्या शिवाय दुसरे काही करता आले नाही.
बहुतांश लोकांनी आधीच आपली घरे मोकळी करुन या भागातून काढता पाय घेतला होता. आपल्या मोकळ्या घरांवर बुलडोझर फिरताना पाहुन स्थानिकांच्या डोळ्यात अश्रु अनावर झाले होते.
नीरा (ता. पुरंदर) येथील पुणे-मिरज रेल्वे लाईन शेजारील प्रभाग १ मधील गोपाळ वस्तीतील सुमारे ४५ कुटुंबांना रेल्वे प्रशासनाच्यावतीने मंगळवार दि. २४ मे पूर्वी घरे खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. बुधवार दि. २५ मे रोजी रेल्वे कोणाच ही मुलाहिजा न बाळगता अतिक्रमण विरोधात कडक कारवाई केली.
दरम्यान एवढी मोठी कारवाई होत असताना व सुमारे ३५० लोकांवर बेघर होण्याची वेळ आली असताना जिल्हा प्रशासनाने मात्र याबाबत कोणतीच दखल घेतली नाही. जिल्हा अधिकाऱ्यांसह मदत आणि पुनर्वसन विभागाने ही याकडे दुर्लक्ष करून ४५ कुटुंबांना वाऱ्यावर सोडले आहे.एकीकडे केंद्र सरकार सर्वाँना घरे देण्याचे सांगत असताना इथे मात्र सरकारच गोर गरीब लोक बेघर करीत आहे.एवढी मोठी कारवाई होत असताना जिल्हा प्रशासनाने याबाबत खबरदारी घ्यायला हवी होती . अशी प्रतिक्रिया आर पी आयचे आमोल साबळे यांनी दिली आहे.
दोन जेसीबीच्या सहायाने सर्व परिसरतील कच्चे पक्के बांधकाम जमिनदोस्त करण्यात आले. साताऱ्याचे सिनियर सेक्शन इंजिनीयर ओस्पाल सिंग यादव यांच्या नेतृत्वात २१ कर्मचारी या कारवाईत सहभागी होते. घोररपडीचे आरपीएफ सिनीयर इन्सस्पेक्टर अजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफचे १६ पोलीस कर्मचारी, जेजुरी पोलीस स्टेशनचे २ व नीरा जी.आर.पी.चे २ कर्मचाऱ्यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
रेल्वे खाते अतिक्रमण विरोधात कडक कारवाई करणारच, त्यामुळे २० घरकुलधारक व २५ झोपडीधारकांनी वेळीच सावध पवित्रा घेत आपली घरे मोकळी करुन, घरसामान सुरक्षित ठिकाणी पोहच केले. या ४५ कुटुंबातील सुमारे ३५० लोकांना आता बेघर होण्याची वेळ आली आहे.
मागील दोन दिवसांत गोपाळ वस्तीतील हे लोक नीरेच्या विविध प्रभागात भाडोत्री घर किंवा झोपडी उभी करण्यासाठी जागा शोधत होते. काहींनी ग्रामपंचायतीच्या राखीव जागेत, काहींना ठेकेदारांनी आपल्या सोईसाठी आपल्या खाजगी जागेत जागा उपलब्ध करुन दिली. तर काहींनी पालखी तळाच्या मागील जागेत आपला बस्तान बसवले.