पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या वाढीव विजबिलाचा बोजा उचलणार : आमदार संजय जगताप

पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या वाढीव विजबिलाचा बोजा उचलणार : आमदार संजय जगताप

पुरंदर

पुरंदर तालुक्याच्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी खासदार सुप्रिया सुळे आणि पुरंदरचे आमदार संजय जगताप हे पुढे सरसावले आहेत. त्यांनी पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या वाढीव विजबिलाचा बोजा उचलण्याची घोषणा केली असून त्यासाठी एक कोटी रुपयांचे भागभांडवल देण्याचे जाहीर केले आहे.

पुरंदर उपसा सिंचन योजनेबाबत आमदार संजय जगताप यांनी सोमवारी (ता. १५ नोव्हेंबर) शिंदवणे घाटावरील पंपगृहावर शेतकरी व अधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

पावसाअभावी पुरंदर तालुक्यात टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्याने पुरंदर उपसा सिंचन योजनेतून टंचाईच्या भागात पाणी सोडण्याबाबतचा निर्णय लवकरच होईल. नव्या दर आकारणीमुळे वाढीव वीजबिलाचा बोजा शेतकऱ्यांवर पडत आहे.

हा भार उचलण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे आणि आपण स्वतः एक कोटी रुपयांचे भाग भांडवल देणार आहोत, असे आमदार जगताप यांनी सांगितले. लाभार्थी गावांतील पंधरा जणांची समन्वय कमिटी स्थापन करून या कमिटीचे खाते बॅंकेत उघडण्यात येईल. त्या खात्यावर येत्या गुरुवारपर्यंत एक कोटी रुपये जमा केले जातील, असेही त्यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले.

आमदार संजय जगताप म्हणाले की, कोरोनाच्या परिस्थितीमुळे मागील दोन वर्षांत योजनेला देखभाल दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होऊ शकला नाही. मात्र, लवकरच या कामासाठीदेखील निधी उपलब्ध होईल. शेतकरी व अधिकारी यांनी समन्वय ठेऊन योजना चालवावी.

दत्ता झुरंगे यांनी योजनेच्या दुरूस्तीसाठी मागील काही वर्षांपासून निधी मिळाला नाही, त्यामुळे या कामासाठी साठ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी केली. माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे यांनी अजूनही फक्त ३५ टक्के क्षेत्रालाच पाणी मिळत आहे. संपूर्ण क्षेत्रातील शंभर टक्के शेती सिंचनाखाली येणे गरजेचे असल्याचे सांगितले.

या वेळी जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुदाम इंगळे, गणेश जगताप, कार्यकारी अभियंता महेश कानेटकर, पंचायत समिती सदस्या सुनीता कोलते, युवक काँग्रेसचे अध्यक्ष माऊली यादव, विकास इंदलकर, एकनाथ यादव, प्रकाश कड, देवीदास नाझीरकर, बाजीराव कुंजीर व लाभार्थी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *