पुणे
पुणे शहरातून धक्कादायक वृत्त समोर आले आहे. पुणे रेल्वे स्टेशन परिसरात ७ वर्षीय चिमुकलीचे लैंगिक शोषण झाल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे.
सदर घटना सोमवारी दुपारी घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात पोस्को आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ वर्षीय चिमुरडीच्या वडिलांचा स्टेशन परिसरात चहाचा स्टॉल आहे. दुपारी ही मुलगी वडिलांना जेवणाचा डबा देण्यासाठी गेली. डबा देऊन परत येत असताना एका अज्ञात व्यक्तीने तिचे अपहरण केले.
त्यानंतर फलाट क्रमांक सहाच्या भिंतीजवळ असणाऱ्या कन्स्ट्रक्शन ऑफिसच्या शेजारील बंद असणाऱ्या खोलीत नेऊन तिचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या अज्ञात आरोपीने चिमुरडीला ठार मारण्याची धमकी दिली. मात्र, लघुशंकेच्या बहाण्याने ही मुलगी बाहेर गेली आणि त्याच्या तावडीतून सुटली.
दरम्यान, नराधमाच्या तावडीतून सुटून मुलगी पळत पळत तिच्या घरी गेली. घरी आल्यानंतर तिने तिच्यासोबत झालेला सर्व प्रकार आईला सांगितला. त्यानंतर तिच्या पालकांनी पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुलीच्या पालकांनी पोलिसांत त्या अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली.
पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला आहे. परंतु अद्याप तो आरोपी फरार आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीचा शोध सुरू केला आहे.