पुणे
पुण्यात काही दिवसांपूर्वी एका मद्यधुंद तरुणीचा रस्त्यावर धिंगाणा करण्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर आता पुन्हा तशीच एक घटना समोर आली आहे. पुण्याच्या दांडेकर पुलावर नीलायम जवळ एका मनोरुग्णाने धिंगाणा घातला. या मनोरुग्णाने एका रुग्णवाहिकेचा ताबा घेतला होता. त्यामुळे या मनोरुग्णाला पकडताना पोलिसांची मोठी कसरत झाली. अखेर पोलिसांनी मोठ्या शिताफीने मनोरुग्णाला पकडलं.
संबंधित घटना ही आज सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. नीलायम टॉकीजजवळ एक मनोरुग्ण रस्त्याने जाणाऱ्या गाड्या अडवत होता. त्या गाड्यांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत होता. तसेच तो गाड्यांवर दगडफेकही करत होता. या माथेफिरुच्या अंगावर कपडेही नव्हते. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणारे नागरिक त्याला घाबरत होते. या दरम्यान काही वाहतूक पोलिसांना माथेफिरु विषयी माहिती मिळाली. पण तोपर्यंत उशिर झाला होता. माथेफिरुने एका रुग्णवाहिकेवर ताबा मिळवलेला होता.
मनोरुग्णाने रुग्णवाहिकेवर ताबा मिळवल्याने पोलिसांची मोठी कसरत झाली. पोलिसांनी त्याला पकडण्याचा आणि अडवण्याचा पूरेपूर प्रयत्न केला. यावेळी तिथे असलेल्या तीन प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना मदत केली. अखेर मोठ्या कसरतीनंतर मनोरुग्ण पोलिसांच्या हाती लागला. जवळपास पाऊण तास या नाट्यमय घडामोडी घडत होत्या. अखेर मोठ्या मेहनतीनंतर माथेफिरु पोलिसांच्या हाती लागला. हा मनोरुग्ण पोलिसांच्या हाती लागला नसता तर मोठा अनर्थ घडला असता असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.