पुणे जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना!!!!लग्नाचा मुहूर्त ठरलेल्या दिवशीच करावा लागला दशक्रिया विधी;वर मुलाचा अपघाती मृत्यू

पुणे जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना!!!!लग्नाचा मुहूर्त ठरलेल्या दिवशीच करावा लागला दशक्रिया विधी;वर मुलाचा अपघाती मृत्यू

पुणे

तारीख निश्चित झाल्याने घरात लगीनघाई सुरू होती, लग्नसोहळ्यासाठी बहुतांश नातेवाईक आले होते. पण, नियतीच्या क्रूर थट्टेने आनंदाचा सोहळा क्षणात शोकसभेत बदलला. मंचर (ता. आंबेगाव) येथील क्षीरसागर कुटुंबातील वर मुलगा अविनाश ऊर्फ रोहित क्षीरसागर (वय 27) याचा अपघाती मृत्यू झाल्याने, ज्या दिवशी त्याचा विवाह ठरला होता, त्याच दिवशी दशक्रिया विधी पार पाडावा लागला.

हा शोकांत प्रसंग पाहून संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे.
अविनाश हा नाभिक समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील तरुण. काही दिवसांपूर्वीच निघोज येथील मुलीसोबत त्याचा विवाह ठरला होता. सोमवारी, दि. 25 ऑगस्ट रोजी लग्नाची तारीख ठरली होती. मात्र त्याआधीच 15 ऑगस्ट रोजी झालेल्या भीषण अपघातात त्याचा मृत्यू झाला.

रोहित आई-वडिलांना घेऊन दुचाकीवरून निघोजहून परत मंचरकडे येत असताना पारगाव हद्दीतील भीमाशंकर साखर कारखान्याजवळ ही घटना घडली. लोखंडी पत्र्यांनी भरलेला टेम्पो मागे घेताना दुचाकीला धडक बसली. या अपघातात रोहितचा जागीच मृत्यू झाला तर त्याचे आई-वडील गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर

मंचर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पारगाव पोलिस ठाण्यात टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहितच्या आयुष्यात नुकतीच उमेद आणि स्वप्नांची पालवी फुटली होती. 25 ऑगस्ट हा त्याच्या आयुष्यातील नवे आयुष्य सुरू होण्याचा दिवस असणार होता. या दिवशी त्याचे लग्न व्हायचे होते.

मात्र, याच दिवशी नातेवाईकांना दशक्रियेसाठी जमावे लागले. विवाह सोहळ्यासाठी जी मंडळी घरी आली असती, तीच मंडळी अंत्यसंस्कारासाठी हजर राहिली. आज रोहित आपल्यामध्ये असता तर मंगलाष्टकाच्या गजरात आपण सारे जमलो असतो. पण, नियतीने अश्रूंच्या धारा वाहायला भाग पाडले, अशा हळहळीच्या भावना नातेवाईक व्यक्त करत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *