जुन्नर
जुन्नर तालुक्यातील धामनखेल येथील विशेष मुलांची माय ऍक्टिव्हिटी नंदनवन शाळा आहे. या शाळेचे शिक्षक विकास बाजीराव घोगरे व कर्मचारी सुभाष दिलीप ठोकळ यांनी गतिमंद व अपंग असलेल्या माधव शिंदे या विद्यार्थ्यांला जबर मारहाण केल्याप्रकरणी जुन्नर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माय ऍक्टिव्हिटी नंदनवन या शाळेत नुकताच माधव शिंदे या विद्यार्थ्यांने प्रवेश घेतला होता. मात्र या विशेष मुलाला जबर मारहाण केली गेली असून त्यात त्याच्या हाडांची मोडतोड झाली आहे. शाळेतील लोखंडी पाईपने डाव्या हाताच्या खांद्यावर, सीटवर तसेच उजव्या पायाच्या घोट्यावर मारहाण केली आहे. या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.मुलाच्या डाव्या हातावर जखमांचे व्रण आहेत. हा विद्यार्थी सध्या जुन्नर येथील मॅक्स केअर सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून आरोपी शिक्षक व कर्मचारी दोघे अटकेत आहेत. त्यांना पाच दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे.