जुन्नर
जुन्नर तालुक्यातील १४ नंबर कांदळी येथील अनंत ग्रामीण बिगर सेती सहकारी पतसंस्थेतील व्यवस्थापकाचा गोळीबारात मृत्यु झाला आहे.
दुपारी दीड वाजताच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती पतसंस्थेत आले आणि त्यांनी गोळीबार केला. यामध्ये व्यवस्थापक राजेंद्र दशरथ भोर यांचा मृत्यु झाला आहे.
ते ५२ वर्षांचे होते. मिळालेल्या माहितीनुसार, १४ नंबर येथील अनंत पतसंस्था ही पुणे नाशिक महामार्गाजवळ आहे.
दुपारचे दीड वाजले होते. पतसंस्थेत जेवणाची वेळ झाली होती. व्यवस्थापक राजेंद्र भोर आणि लिपीक अंकिता नेहरकर हे जेवण करत बसले होते.
त्याचवेळी दोन अज्ञात व्यक्तींना पतसंस्थेत प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी राजेंद्र भोर यांच्याकडे पैशांची मागणी करत गोळीबार करण्यास सुरूवात केली.
गोळीबार केल्यानंतर भोर हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी नारायणगावला नेत असताना उपचारापुर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते.
चोरट्यांनी अडीच लाख रूपयांची रोख रक्कम लंपास केली असल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी श्वान पथक आणि पोलिस दाखल झाले आहेत आणि पुढील तपास करत आहेत.
दरम्यान या घटनेने कांदळी गाव हादरले आहे. गावातील या घटनेने दहशतीचे वातावरण पसरले आहे. व्यवस्थापक राजेंद्र भोर यांच्या कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.