मावळ
उन्हाळ्यात पाण्यासाठी गावागावांत महिलांची वणवण होत असल्याचे चित्र नेहमीच पाहायला मिळते. परंतु पावसाळ्यात मुसळधार पाऊस कोसळत असताना देखील महिलांना पाण्यासाठी कोसो लांब जावं लागत असल्याच चित्र सध्या मावळ तालुक्यात पहायला मिळत आहे. पावसामुळे मावळ तालुक्यात निसर्गाचे सौंदर्य खुलत असते. परंतु पाऊस असूनही गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.
मावळ तालुक्यातील नाणे मावळ भागाच्या दुर्गम भागातील असलेल्या थोरण आणि जांभवलीच्या ग्राम पंचायतीकडून पावसाळ्यात पाणीपुरवठा करण्यासाठी मनाई करण्यात आली. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी सह्याद्रीच्या कडेकपारीत तसेच ओढ्यावर भटकंती करावी लागत आहे. गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून ग्रामपंचायत पावसाळ्यात पाणीपुरवठा बंद करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
पाण्यासाठी महिलाची होणारी वणवण ही केवळ लाइटची समस्या असल्यामुळे होत असल्याचे बीडीओ भागवत यांनी सांगितले. मात्र जलजीवन योजनेअंतर्गत दोन कोटी रुपयांचा निधी आला असून पावसाळ्यानंतर काम सूरु करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
थोरण व जांभवली ही नाणे मावळ भागातील सर्वात शेवटची व दुर्गम भागातील गावे आहेत. या गावांमध्ये गेल्या 15 वर्षापूर्वी नळ पाणीपुरवठा योजना बसविण्यात आली. ग्रामपंचायत टाटा धरणातून या गावांना पाणीपुरवठा करते. मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर येथे ग्रामपंचायत पाणीपुरवठा बंद करते. त्यामुळे महिलांना नैसर्गिक स्रोतांवर पाणी भरायला जावे लागते. शेतीची कामे सोडून पाणी वाहण्यासाठी येथील नागरिकांना व महिलांना तासन्तास वाया घालवावे लागतात.
पावसाळ्यात या भागात ओला दुष्काळ निर्माण होत असताना हंडाभर पाण्यासाठी जीवाची ओढतोड करावी लागत आहे. महिलांप्रमाणे घरातील मुलींना देखील शाळा, कॉलेज आणि अभ्यास सोडून पाणी भरण्यासाठी वेळ घालवावा लागतो. त्यामुळे शिक्षण घेऊन सुशिक्षित व्हायचं की या पाण्यामुळे शिक्षण बाजूला ठेवायचे असा प्रश्न शालेय विद्यार्थिनींना पडला आहे.