पुणे
अभ्यास करत नसल्याचा राग आल्याने वडिलांनी स्वतःच्या नऊ वर्षांच्या मुलाचा गळा दाबून खून केल्याची हृदयद्रावक घटना बारामती तालुक्यातील होळ येथे घडली. आरोपी वडील विजय गणेश भंडलकर यांनी आपल्या मुलाला भिंतीवर आपटून, त्याचा गळा आवळून त्याचा जीव घेतल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांनी विजय गणेश भंडलकर, शालन विजय भंडलकर, आणि संतोष सोमनाथ भंडलकर (सर्व रा. होळ, ता. बारामती, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.14 जानेवारी रोजी दुपारी अडीचच्या सुमारास पियुष (वय 9) घरात असताना, वडील विजय भंडलकर यांनी त्याला अभ्यासाविषयी खडे बोल सुनावले.
“तू सारखा बाहेर खेळतोस, तुझी आईसारखा वागत माझी इज्जत घालवतोस,” असे म्हणून त्यांनी रागाच्या भरात पियुषला भिंतीवर आपटले. त्यानंतर गळा दाबून त्याचा खून केला.घटनेच्या वेळी आई शालन भंडलकर हजर होती. परंतु, तिने पतीला थांबवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही.
उलट, विजय भंडलकर यांच्या सांगण्यानुसार पियुष हा चक्कर येऊन पडल्याचे खोटे कारण सांगितले.संतोष भंडलकर यांनी मुलाला निरा येथील भट्टड डॉक्टरांकडे नेले. तेथेही मुलाचा मृत्यू चक्कर येऊन झाल्याचे सांगण्यात आले. डॉक्टरांनी पियुष मयत झाल्याचे सांगून त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यास सांगितले. मात्र, त्या तिघांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात न जाता पियुषचे प्रेत गावी नेले.
मुलाच्या मृत्यूविषयी कोणालाही कळू नये म्हणून पोलीस पाटील किंवा इतरांना माहिती न देता थेट अंत्यविधीची तयारी करण्यात आली.पोलिसांनी गुन्ह्याची माहिती मिळताच विजय भंडलकर व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात खुनाचा आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे करत आहेत.