पुणे
पुण्यातून काळीज सुन्न करणारी एक घटना समोर आली आहे. सिंहगड ग्रामपंचायत हद्दीतील एका गावात रस्त्यावरच एका पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.सदर घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, घेरा-सिंहगड ग्रामपंचायत हद्दीत स्मशानभूमी नाही.
तसेच त्यामुळे ओढ्याला पाणी आल्याने गावकऱ्यांना मृतदेहावर अंत्यसंस्कार करता येत नव्हते. त्यामुळे त्यांनी भरपावसात रस्त्यावरच अंत्यसंस्कार केलेत.चितेवर आसरा म्हणून येथील नागरिकांनी लाकडी खांब उभे करून त्यावर पत्रे टाकले होते.
सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या आतकरवाडीत स्मशानभूमी नसल्याने ओढ्यालगत शेताच्या बांधावर छोट्याशा जागेत अंत्यसंस्कार केले जातात. परंतु, पावसाळ्यात ओढ्याला जास्त पाणी असते. त्यावेळी तेथे पोहचणे शक्य होत नाही. त्यामुळे, रस्त्यावर अंत्यसंस्कार करण्याशिवाय पर्याय नसतो.
आज गावातील एकाचा मृत्यू झाला त्यामुळे पाऊस आणि ओढ्याचे पाणी कमी होण्याची वाट पाहावी लागली. मात्र पाणी काही कमी झाले नाही. त्यामुळे अखेर तीन तासानंतर ग्रामस्थांनी भर पावसातच चितेवर आसरा म्हणून लाकडी खांब उभे करून त्यावर पत्रे टाकले आणि अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला.