पुणे
पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दीड महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या तरुणाची त्याच्याच सासुरवाडीत भरदिवसा शेतात हत्या झाली. मावळ तालुक्यातील गहुंजे परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सूरज काळभोर (वय २८) असं मृत झालेल्या तरुणाचं नाव असून तळेगाव पोलीस स्टेशन हद्दीत ही हत्या झाली आहे. दीड महिन्यांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. या घटनेची माहिती मिळताच, तळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरज काळभोर याचा गहुंजे येथील संतोष बोडके यांच्या मुलीशी दीड महिन्याभरापूर्वी लग्न झाले होते. सूरज हा आकुर्डी येथील स्टार हॉस्पिटल परिसरात राहात होता.
त्याची आई ही महापालिकेच्या दवाखान्यात कामाला आहे. तर सूरज पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये नोकरी करत होता. त्याला वडील नसून तो आई आणि पत्नीसोबत तो राहात होता. मात्र, अचानक झालेल्या घटनेनं आई आणि पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सूरज हा कामानिमित्त आज तो गहुंजे येथील सासुरवाडीत आला होता. त्यावेळी पत्नी आणि तो शेतात फिरत असताना अज्ञात तीन ते चार व्यक्तींनी त्याच्यावर कोयत्याने हल्ला चढवला. त्याच्यावर सपासप वार केल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला आहे.
हल्ला केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले असून तळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हल्ला कुठल्या कारणाने झाला याचे कारण अद्याप समोर आले नसून तळेगाव पोलिसांकडून याचा तपास करण्याचे काम सुरू आहे.