पुणे
दौंड तालुक्यातील खामगाव गावच्या हद्दीत मुळा-मुठा नदी पात्रात पोत्यात बांधलेल्या अवस्थेत एका ३० ते ३५ वयोगटातील अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची घटना सोमवारी (दि.२९) उघडकीस आली असल्याची माहिती यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली.
या प्रकरणी अधिक माहिती अशी आहे की, मुळा-मुठा नदीच्या पाण्यावर सुतळी पोत्यामध्ये भरलेल्या अनोळखी पुरुषाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती खामगावचे पोलीस पाटील प्रदीप जगताप यांनी यवत पोलिसांना दिली.यानंतर पोलीस उपनिरीक्षक अक्षय मोरे, पोलीस हवालदार विनायक हाके, गणेश करचे, संदिप देवकर, दत्तात्रय काळे यांच्या पथकाने घटनास्थळी जात घटनेचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेतला.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नदीला मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. अज्ञात आरोपीने कोणत्यातरी कारणावरून अज्ञात पुरुषाचा खून करून तो गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी पोत्यात भरून नदीच्या पाण्यात टाकून दिल्याची श्यक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. अनोळखी पुरुषाचे वर्णन असे आहे की, वय अंदाजे ३० ते ३५ वयोगटातील असून उजव्या हातावर बदाम आणि महादेवाची पिंड गोंदलेली आहे.
उजव्या हाताच्या दंडावर सिंहाचे टँट्यु गोंदलेले असून डाव्या हाताच्या पोटरीवर बदाम त्यामध्ये SLG असे गोंदलेले आहे.अंगावर लाल रंगाचा टीशर्ट आणि राखाडी रंगाची पॅन्ट घातलेली असून कमरेला चामडी बेल्ट घातलेला आहे.
मृतदेह आढलेल्या अज्ञात पुरुषाची अद्यापी ओळख पटू शकली नसून अज्ञात पुरुषाबाबत कोणास माहिती असल्यास यवत पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी केले आहे. अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सपांगे करीत आहेत.