पुणे
उरळगाव (ता.शिरुर) येथील महिलेला व तिच्या मुलाला शेतातील विजेच्या खांबाच्या वादातून धमकी देण्यात आली. या महिलेला बीडचा संतोष देशमुख करण्याची धमकी देत तिचा विनयभंग करण्याची धमकी देण्यात आली.याप्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात बाळासाहेब बबन जांभळकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
उरळगाव (ता.शिरुर) येथील महिला तिच्या मुलासह शेतात घेतलेले वीज कनेक्शन जोडण्यासाठी गेलेली असताना न्हावरे गावातील बाळासाहेब जांभळकर तेथे आला. त्याने महिलेच्या मुलाला दगड दाखवून या खांबावरून लाईन घ्यायची नाही, असे म्हणून दमदाटी करु लागला.
दरम्यान, महिला त्याला समजावून सांगत असताना बाळासाहेब याने महिलेला अश्लील शिवीगाळ करत हातवारे करुन महिलेच्या मनास लज्जा निर्माण होईल, असे वर्तन केले.तसेच यावेळी येथील शेती विकून जा, नाहीतर तुमचा बीडचा संतोष देशमुख करेल, अशी धमकी देऊन महिलेच्या शेतातील आंब्याच्या झाडांसह कंपाउंडचे नुकसान केले.
याबाबत महिलेने शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी बाळासाहेब बबन जांभळकर (रा.न्हावरे, ता.शिरुर जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर हे करत आहे.