पुणे
दारूच्या नशेत पोटच्या मुलानेच बापाचा खून केल्याची धक्कादायक घटना मावळ तालुक्यातील जवण येथे घडली. घरातून दुर्गंधीयुक्त वास आल्याने नागरिकांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याला माहिती दिल्याने ही बाब उघडकीस आली आहे. दरम्यान आरोपीने खून करून पलायन केले होते. पोलिसांनी आरोपी मुलाला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे.
खंडु गिरंजे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते जवण पवनानगर परिसरातील रहिवासी होते.तर शेखर गिरंजे असे आरोपी मुलाचे नाव आहे. याप्रकरणी भाऊ सखाराम गिरंजे यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत खंडु गिरंजे व शेखर खंडु गिरंजे यांच्यामध्ये दारूच्या नशेत वाद झाला आणि तो वाद इतका विकोपाला गेला की, मुलगा शेखर याने आपले वडील खंडु गिरंजे यांचा गळा दाबून खून केला.
त्यानंतर मुलगा तेथून पळून गेला होता. मात्र मोठ्या शिताफीने लोणावळा पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले. आरोपीला गुरुवार पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस पुढील तपास करत आहेत.