पुणे
जावयाने सासऱ्याचा खून केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील बोरीबेल या गावात घडली आहे. याबाबत रहिना बाबूजी चव्हाण हिने फिर्याद दिली असून, दौंड पोलीस ठाण्यात जावयाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी लकझऱ्या कोब्या काळे(रा. लासुर्ने ता. इंदापूर जि. पुणे) हा बोरीबेल येथे सासरवाडीला आला होता. यावेळी फिर्यादीचे सासरे सुदाम हिऱ्या चव्हाण यांनी ‘तू माझ्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवतो आणि तू आमच्या घरी येऊन राहतो’, असे म्हणून आरोपी लकझऱ्या शिवीगाळ करून त्याला हातातील दगड फेकून मारला.
यावेळी लकझऱ्या याला फिर्यादीने समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र लकझऱ्याने त्याच्याकडे असणाऱ्या मोठ्या चाकूने सासऱ्याच्या छातीमध्ये जोरात चाकू खूपसला. त्यामुळे सुदाम हा गंभीर जखमी झाला.मोठ्या प्रमाणावर त्याचे रक्तस्त्राव झाल्याने तो बेशुद्ध पडला.
दरम्यान लकझऱ्या तेथून पळून गेला. नातेवाईकांनी सुदाम यांना बेशुद्ध अवस्थेत दुचाकीवर बसवून दौंड येथील शासकीय रुग्णालयात घेऊन गेले. तेथील डॉक्टरांनी जखमी सुदाम चव्हाण यांना तपासून मृत घोषित केले. सदर घटनेबाबत दौंड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी लकझऱ्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.