पुणे
बारामती तालुक्यातील सुपा परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून, एका तरुण महिलेची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकून दिल्याचे उघड झाले आहे.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मृत महिलेचे वय अंदाजे 25 ते 27 वर्षे असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.ही घटना सुपे गावाजवळील काळखैरेवाडी हद्दीत असलेल्या खैरेपडळ परिसरात आज पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. काही ग्रामस्थ सकाळी रस्त्याने जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला एका महिलेचा रक्ताने माखलेला मृतदेह दिसून आला. मृतदेह विवस्त्र अवस्थेत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच सुपा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
प्राथमिक तपासात संबंधित महिलेवर धारदार शस्त्राने अनेक वार करण्यात आल्याचे आढळून आले आहे. जखमांची तीव्रता पाहता हत्या अत्यंत क्रूरपणे करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. ओळख लपवण्यासाठी किंवा पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानेच मृतदेह निर्जन ठिकाणी आणून टाकण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही हत्या नेमकी याच ठिकाणी झाली की अन्यत्र करून मृतदेह येथे टाकण्यात आला, याचा तपास सुरू आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपासासाठी फॉरेन्सिक पथक आणि श्वानपथकाला पाचारण करण्यात आले आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची 5 पथके वेगवेगळ्या दिशांना रवाना करण्यात आली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल तांत्रिक माहिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.
या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज नवसरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, हत्येमागील कारण काय आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. प्रेमसंबंध, वैयक्तिक वाद किंवा अन्य कोणते कारण आहे का, याबाबत तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

