पुणे
रायरेश्वर मंदिराजवळील माळवाडी येथे घडलेली एक घटना ऐकून आणि पाहून संपूर्ण तालुका थक्क झाला आहे. वाघमारे कुटुंबाच्या पाळीव म्हशीने जन्म दिलेले रेडकु हे साधारण म्हशीसारखे नसून त्याचे रूप रानगव्याप्रमाणे आहे.शरीराचा रंग काळा आणि पांढरा मिश्रित, मजबूत अंगकाठी, डोक्यावरील रचना व डोळ्यांतील चमक पाहून हे रेडकु रानगव्याशी साम्य असलेले असल्याचे स्पष्ट होते. पुणे जिल्ह्यात ही केवळ दुसरीच घटना असून यापूर्वी अशीच घटना सुस बावधन भागात घडली होती.
निरीक्षणानंतर हे रेडकु रानगव्याच्या वैशिष्ट्यांसह असल्याचे स्पष्ट झाले. आता त्याचा नेमका वांशिक संबंध निश्चित करण्यासाठी डीएनए तपासणी व रक्त परीक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतरच रेडकुला त्याच ठिकाणी ठेवायचे की ट्रान्झिट सेंटर अथवा वन्यजीव संवर्धन केंद्रात हलवायचे याचा निर्णय घेतला जाणार आहे.
विशेष म्हणजे पाळीव म्हैस व रानगव्याच्या संगमातून जन्मलेले रेडकु म्हणजे एक अत्यंत दुर्मिळ जैविक घटना आहे. अशा संकरातून जन्मलेल्या पिल्ल्यांच्या वाढीमान, प्रजननक्षमता आणि भविष्यातील अस्तित्वाबाबत नेहमीच शास्त्रीय शंका निर्माण होतात. म्हणूनच वनविभागाकडून या घटनेचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे.
रायरेश्वर मंदिर हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची पहिली शपथ घेतलेला ऐतिहासिक परिसर आहे. अशा ऐतिहासिक व निसर्गसंपन्न क्षेत्रात पाळीव म्हशीला रानगव्यापासून रेडकु झाल्याची ही घटना घडणे केवळ पुणे जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील दुर्मिळ घटनांपैकी एक मानली जात आहे. स्थानिकांनीही या घटनेला निसर्गातील अद्भुत घटना असे म्हटले आहे. आता वनविभागाचा निर्णय व वैज्ञानिक तपासणी याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.