पुरंदर
गेल्या चार दिवसांपासून पुरंदर तालुक्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतमाल, घरे व अन्य मालमत्ता यांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. गावोगावी याबाबत आढावा घेऊन तत्काळ पंचनामे करावेत अशा सूचना आमदार विजय शिवतारे यांनी दिल्या आहेत. पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांना याबाबत तातडीने कार्यवाही करावी असे सांगण्यात आले आहे.
पुरंदर तालुक्याच्या बहुतांश भागात मागील काही दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे. धुव्वाधार पावसामुळे तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या पूर्णतः मिटली असून जवळपास सर्वच गावातील टँकर देखील बंद होण्याच्या स्थितीत आहेत. कऱ्हा नदीच्या खोऱ्यात पावसाने यंदा दमदार हजेरी लावल्यामुळे बरेच ओढे नाले खळाळून वाहिले आहेत. काही गावांमध्ये पावसाचा तडाखा इतका जोरदार होता की त्यात घरांची देखील पडझड झालेली आहे. गुरांचे गोठे नुकसानग्रस्त झालेले आहेत. अशा सर्व नुकसानीची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी आणि तसे जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवावे असे शिवतारे यांनी निर्देश दिलेले आहेत. तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव यांनाही शेतीच्या नुकसानीबाबत महसूल विभागाशी समन्वय साधावा असे सूचित करण्यात आलेले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याशी शिवतारे यांनी दूरध्वनीवरून चर्चा करत शक्य तेवढी मदत करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवावेत असे सांगितले आहे.
दरम्यान गावोगावी महसूल आणि कृषी विभागाची यंत्रणा याकामी सज्ज झाली असून नुकसान झालेल्या लोकांनी आपापल्या गावातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन शिवतारे यांनी केलेले आहे. याशिवाय गरज भासल्यास सासवड शिवसेना कार्यालयाशी संपर्क साधावा असेही ते म्हणाले.