बीड
संकटे आली की ती चोहीबाजूने येतात. अगदी तशीच अवस्था ही शेतकऱ्यांची झाली आहे. खरीप हंगामातील केवळ मुख्य पिकेच नाही तर नगदी पिक म्हणून लागवड करण्यात आलेल्या कांद्यातूनही शेतकऱ्यांचा वांदाच झाला आहे. खरिपातील कांदा जोपासूनही पोसलाच नसल्याने त्रस्त शेतकऱ्याने आता या 2 एकरातील कांद्याच्या फडात जनावरेच सोडून दिली आहेत.
2 एकरातील कांदा 4 महिने जोपासण्यासाठी लाखो रुपये खर्ची करुनही जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील क-हेवडगांव येथील शेतकऱ्याच्या पदरी निराशाच पडलेली आहे. कांदा पोसलाच नसल्याने त्याची काढणी आणि कापणी यामध्ये अधिकचा खर्च न करता त्यांनी थेट जनावरे सोडून आता पुढील पिक घेण्यासाठी शेत रिकामे करण्यावर भर दिला आहे.
खरीप हंगामातील 2 एकरातील कांदा 4 महिने आणि 20 दिवस जोपासण्यासाठी सांगळे यांना तब्बल 90 हजार रुपये खर्ची करावे लागले होते. शिवाय मेहनत ही वेगळीच. मात्र, ढगाळ वातावरण आणि सततच्या पावसामुळे हा कांदा जोपासलाच नाही.
हंगामाच्या पहिल्या टप्प्यात केवळ 30 किलो कांदा विक्रीच्या अवस्थेत होता. यातूनच त्यांना 920 रुपये मिळाले होते. त्यानंतर कांदा पिक काढणीच्या अवस्थेतच नसल्याने त्यांनी यामध्ये जनावरेच सोडली.
कांद्याचे दरात कायम अनियमितता असते. कधी रात्रीतून वाढलेल्या दरामुळे शेतकऱ्यांची चांदी होते तर कधी नुकसान. मात्र, यंदा निसर्गाचा लहरीपणा असल्यामुळे शेतकऱ्यांचेच अधिकचे नुकसान झालेले आहे. कांदा पोसलाच नाही त्यामुळे काढणी आणि कापणीचा प्रश्नच निर्माण झाला नाही.
त्यामुळे शेतकरी भगवान सांगळे यांनी रब्बी हंगामातील दुसरे पीक घेण्याच्या उद्देशाने कांदा पिकातच जनावरे सोडली. किमान जनावरांना चारा म्हणून तरी कांद्याचा उपयोग ही त्यामागची त्यांची भूमिका होती.
आष्टी तालुक्यातील क-हेवडगांवातील भगवान सांगळे या शेतकऱ्याने 2 एकर पावसाळी कांदा लावला होता. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. विशेषतः कांदा उत्पादकांना याचा मोठा फटका बसला आहे. अवकाळी व सततच्या पावसामुळे कांदा पिकाची वाढ च झाली नाही यामुळे कांदा पोसलाच नाही.
जो काही कांदा विकला गेला त्याला क्विंटलमागे चांगला भाव मिळत आहे. मात्र, कांदा पोसलाच नसल्याने विक्रीची काय अपेक्षा करावी असा सवाल सांगळे यांनी उपस्थित केला आहे. पिकांची पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.