सातारा
विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. साताऱ्यातल्या खंडाळा तालुक्यातील कोपर्डे सासर असणाऱ्या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. मयुरी चंद्रशेखर शिंदे असं विवाहितेचं नाव आहे. पोलिसांनी विवाहितेच्या सासरकडील 7 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
मयुरी चंद्रशेखर शिंदे असे त्या विवाहितेचे नाव असून चार वर्षा पूर्वी मयुरी आणि चंद्रशेखर यांचा विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा असून कोपर्डे येथील हे दाम्पत्य आपल्या मुलासमवेत गुजरातच्या नवसारी येथे नोकरी निमित्ताने राहत होते. पण गुजरात आणि कोपर्डे येथे वारंवार होणाऱ्या सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन गुजरात येथे आत्महत्या केली.
यानंतर आत्महत्या केलेल्या विवाहितेचा अंत्यविधी माहेरच्या मंडळींनी सासरच्या दारातच केल्याने तणाव निर्माण झाला. लोणंद पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून मध्यस्थी करत प्रकरण हाताळल्याने तणावावर नियंत्रण मिळवता आले. याप्रकरणी सासरच्या मंडळींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरे उत्तमराव शिंदे सासु बेबी शिंदे , नवरा चंद्रशेखर शिंदे , दिर प्रशांत शिंदे, नणंदा संगीता भोसले,स्वाती काकडे, मंगल कदम या लोकांचे विरोधात आत्महत्या करण्यास प्रवृत केले प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.