सांगली
आईसोबत तलावात कपडे धुण्यास गेलेल्या दोघा सख्खा भाऊ बहिणीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जत तालुक्यातील उमराणी येथे घडली आहे.
रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. सावित्री बाबुराव यादव (13 ) आणि अभिजीत बाबुराव यादव(11) अशी पाण्यात बुडून अंत झालेल्या दुर्दैवी मुलांचे नावे आहेत.
जत तालुक्यातील उमराणी व सिदूर रस्त्यावर यादव वस्ती नजिक कुराण पाझर तलाव आहे. या पाझर तलावात मोठ्या प्रमाणात पाणी आहे. या ठिकाणी कपडे धुण्यास व जनावरांना पाणी पाजण्यासाठी लोकांची गर्दी असते. अभिजित व सावित्री हे दोघे आपल्या आईसोबत तलावावर कपडे धुण्यासाठी गेले होते.
हे दोघे पण तलावातील पाण्यात खेळत होते. मात्र तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचे पाय गाळात रुतले. दोघांनीही बाहेर निघण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला. काळाने त्यांचा बळी घेतला आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास जत पोलीस करीत आहेत.