पुणे
पुणेकरांसाठी आणि विशेषतः दिवेघाट मार्गे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 वर (आळंदी-पंढरपूर पालखी महामार्ग) हडपसर ते दिवेघाट या पॅकेज 6 अंतर्गत रस्ता रुंदीकरणाचे काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने सध्या वेगात सुरू आहे.या कामाच्या पार्श्वभूमीवर दिवेघाट परिसरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत.
पालखी मार्गाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी दिवेघाट परिसरातील खडकांमध्ये स्फोट (ब्लास्टिंग) करण्याची गरज आहे. हे ब्लास्टिंग पोलिस प्रशासनाच्या देखरेखीखाली नियोजित पद्धतीने करण्यात येत आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक काही वेळेसाठी थांबवावी लागत आहे.
पोलिस प्रशासनाच्या परवानगीनुसार, ज्या दिवशी खडक फोडण्याचे काम केले जाईल त्या दिवशी दिवेघाट मार्गावरील वाहतूक सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत दोन्ही बाजूंनी पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे त्या दिवशी या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी खालील पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पर्यायी मार्गांबाबत वाहतूक पोलिसांनी पुढील सूचना दिल्या आहेत. दिवेघाट मार्ग बंद असताना वाहनचालकांनी कात्रज-बोपदेव घाट (राज्य मार्ग क्रमांक 131) मार्गे सासवड, खेडशिवापूर-सासवड लिंक रोड मार्गे सासवड, कापूरहोळ-नारायणपूर (राज्य मार्ग क्रमांक 119) मार्गे सासवड आणि हडपसर-उरळी कांचन-शिंदवणे घाट (राज्य मार्ग क्रमांक 61) मार्गे सासवड या पर्यायी मार्गांचा वापर करावा. हे मार्ग दिवेघाट बंद असलेल्या कालावधीत प्रभावी पर्याय ठरणार आहेत.
प्रकल्प संचालक, पुणे यांनी सर्व वाहनचालक आणि प्रवाशांना सूचित केले आहे की, वाहतूक अडथळ्यांमुळे होणारा त्रास टाळण्यासाठी नियोजित प्रवासाच्या अगोदर मार्ग तपासूनच बाहेर पडावे. कामाच्या वेळा आणि वाहतूक बंदीबाबत पोलिसांच्या अधिकृत सुचनांकडे लक्ष ठेवावे.