दिवे बाजाराची फाईल सुसाट ; आमदारांच्या मर्यादा उघड

दिवे बाजाराची फाईल सुसाट ; आमदारांच्या मर्यादा उघड

पुरंदर

तब्बल तीन वर्ष धूळ खात पडलेली दिवे ता. पुरंदर येथील राष्ट्रीय बाजार प्रकल्पाची फाईल आश्चर्यकारक वेगाने धावू लागली आहे. महाविकास आघाडी सरकार उलथून टाकल्यानंतर राज्यात आलेल्या शिंदे सरकारने माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या प्रयत्नांना दाद देत दिवे येथील जागेला हिरवा कंदील दाखवला आहे. दरम्यान पडद्याआडून विजय शिवतारे यांनी केलेल्या धावपळीला चांगलेच यश येताना दिसत असून कधी नव्हे ते विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती या तीनही पातळीवर दिव्याची जागा अंतिम करण्याची धांदल उडाली आहे.

पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डच्या विस्तारीकरणासाठी बाजार समितीला जागेची आवश्यकता होती. पुरंदर हवेलीच्या विकासाची ही संधी ओळखून शिवतारे यांनी तत्कालीन महायुती सरकारला दिवे येथील जागेचा प्रस्ताव दिला होता. मात्र २०१९ मध्ये महायुती सरकार जाऊन महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले आणि दिवे ऐवजी इतर अनेक ठिकाणचे प्रस्ताव समोर येऊ लागले. काही महिन्यांपूर्वी तर साष्ठे ता. हवेली येथील प्रस्ताव जवळपास अंतिम करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले. मात्र राज्यात झालेल्या राजकीय उठावाचा पुरेपूर फायदा घेत शिवतारे यांनी सगळ्यांना धोबीपछाड देत पुन्हा दिवे येथील प्रस्ताव बाहेर काढत त्यास मंजुरी मिळवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत .

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मंत्री शिवतारे यांनी मुंबईतून चाव्या फिरवताच जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सर्व संबंधित विभागांची बैठक घेत दिवे येथील जागेला अंतिम मंजुरी देण्यासाठी प्रस्ताव ८ दिवसात मुंबईला सादर करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. महसूल, बाजार समिती आणि मोजणी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ दिवे येथे धाव घेत जागा अंतिम केल्याचे समजते. दरम्यान मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रीय बाजाराची घोषणा करणार असल्याचेही समजते. शिंदे यांच्या ऑन द स्पॉट निर्णय प्रक्रियेमुळे पुरंदर हवेलीला मोठ्या प्रकल्पांची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.

सर्व बाजार एकाच संकुलात
गुलटेकडी बाजार हा १७० एकरात आहे. दिवे येथील बाजाराचे क्षेत्र हे त्यापेक्षा बरेच मोठे असणार आहे. बाजाराच्या पळवा पळवी विरोधात शडडू ठोकून मैदानात उतरलेल्या शिवतारे यांनी फळबाजार, फुलबाजार, भाजीबाजार, भुसार बाजार, तरकारी बाजार, गुरांचा बाजार अशा सगळ्या प्रकारचे बाजार या एकाच कॅम्पस मध्ये उभारण्यासाठी ताकद पणाला लावली आहे.

आमदारांच्या मर्यादा उघड
दिवे येथील बाजार संकुलाचा प्रस्ताव अजून कागदावर सुद्धा नाही असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी आमदार संजय जगताप यांनी केलं होतं. मात्र चालु घडामोडींनी आमदारांच प्रशासनातलं अज्ञान चव्हाट्यावर आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *