नाशिक
नाशिकमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून एका ३० वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. नीलेश बाळासाहेब सोनवणे असे मृताचे नाव असून, याप्रकरणी नीलेशची आई आणि भावाने सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार देत निखिल भावले या सावकारावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
भावले हा पैसे वसुलीसाठी नीलेशला सतत त्रास द्यायचा. त्यामुळेच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
सातपूर येथील अशोकनगर भागात नीलेश सोनवणे रहायचा. नीलेशला आर्थिक चणचण होती. त्यामुळे खासगी सावकार निखिल भावले याच्याकडून दहा हजार रुपयांचे कर्ज घेतले होते.
या कर्जाच्या वसुलीसाठी भावलेने गेल्या कित्येक दिवसांपासून नीलेशमागे तगादा लावला होता. तो त्याच्याकडे सतत पैशाची मागणी करायचा. शिवाय अपशब्द उच्चारायचा. यामुळे नीलेश टेन्शनमध्ये होता.
मात्र, काही दिवसांपूर्वी सावकार भावले याने नीलेशची दुचाकी ओढून नेली. त्यामुळे नीलेश नैराश्याच्या गर्तेत गेला. त्यामुळे त्याने गळफास घेत आत्महत्या केली. अशी तक्रार नीलेश आई आणि भावाने सातपूर पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी सावकार निखिल भावलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू केला आहे.