रायगड
महाड तालुक्यातील महिला सरपंचाची हत्या केल्याप्रकरणी ३० वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरुन महिलेचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली. या प्रकरणात बलात्काराचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरपंच महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत जंगलात टाकल्याची घटना तीन दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यात उघडकीस आली होती. जंगलात रस्त्याच्या कडेला दुपारी त्यांचा मृतदेह सापडला होता.
महाड तालुक्यातील एका गावाच्या महिला सरपंचाचा सोमवारी दुपारी खून झाला होता. विवस्त्र अवस्थेत त्यांचा मृतदेह सापडला होता.
या प्रकरणी महाड तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर महाड तालुका पोलिसांनी नऊ टीम बनवून तपास सुरु केला. तपास कामात डॉग स्क्वॉडची मदत महत्त्वपूर्ण ठरली.
अमिर शंकर जाधव (वय 30 वर्ष) याला पोलिसांनी अटक केली आहे. महाडचे उप विभागीय पोलिस अधिकारी निलेश तांबे यांनी याबाबत पत्रकार परीषद घेऊन माहिती दिली.
पूर्वीच्या भांडणाचा राग धरुन आरोपीने महिलेला जीवे ठार मारल्याची कबुली दिल्याचे यावेळी पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी दाखल गुन्ह्यात भारतीय दंड संहिता कलम 376 म्हणजे बलात्काराचा आरोपही आरोपीवर करण्यात आलेला आहे.