पुणे
पत्नीच्या भिशीमुळे कर्जबाजारी झालेल्या पतीने पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूरच्या बार्शीमध्ये घडला आहे. तसंच या व्यक्तीने स्वत:च्या मुलावरही हल्ला केला आहे.याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुझ्या भिशी लावण्यामुळेच मी कर्जबाजारी झालो आहे, असं म्हणत खासगी शिकवणी घेणाऱ्या पतीने पत्नीला आणि मुलाला गाडीवर बसवून शेतात नेलं.शेतात नेल्यानंतर पतीने पत्नीचा ओढणीने गळा आवळला आणि चाकू, दगडाने मारहाण करून हत्या केली.
यानंतर त्याने स्वत:च्या मुलावरही चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केलं. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातल्या नागोबाचीवाडी शिवारात ही घटना घडली आहे.मनिषा अनंत साळुंखे असं हत्या झालेल्या पत्नीचं नाव आहे. तर तेजस अनंत साळुंखे हा त्यांचा मुलगा जखमी झाला आहे.
याप्रकरणी अनंत रामचंद्र साळुंखे याच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. समर्थ अनंत साळुंखे याने याबाबत तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे.