पुणे
तुंबलेल्या पाण्यावर डांबर टाकून रस्ता बनविण्याचा अजब कारनामा पुणे महापालिकेने केला आहे. वारजे माळवाडीत महापालिका कर्मचाऱ्यांनी चक्क रस्त्यावरील साचलेल्या पाण्यात डांबर टाकलं. पुणे महापालिकेची सगळीकडून थट्टा सुरु झाली आहे.
वारजे माळवाडी परिसरात सध्या रस्त्याचे काम सुरू आहे. तिथे रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्यात डांबर ओतल्याचं संबंधित व्हिडीओत दिसत आहे. जर पावसाच्या तुंबलेल्या पाण्यात डांबर टाकून रस्त्याचं काम होत असेल तर मग कुठल्या दर्जाचं असेल, असे सवाल उपस्थित करुन पुणेकर कामाच्या दर्जावरुन टीका करत आहेत.
रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं असूनही पालिका कर्मचाऱ्यांनी भर पाण्यात डांबर टाकलं. त्यांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता चक्क साचलेल्या पाण्यात डांबर ओतलं. रस्त्याचं काम करताना 7 ते 8 कर्मचारी दिसून येत आहेत.
तुंबलेल्या पाण्यावर डांबर टाकून रस्ता बनवण्याचं तंत्र विकसित केल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचं आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक झालंच पाहिजे.