पुरंदर
पुरंदर उपसा योजनेच्या पाणी वाटपा संधर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सरपंचांनी पूर्व निवेदन देऊन मीटिंग आयोजित करण्याचे निवेदन दिले होते.मात्र मीटिंगचे योग्य नियोजन न करता अधिकाऱ्यांनी गावोगावच्या सरपंच,ग्रामस्थांना अघोरी वागणूक दिली.यामुळे उपस्थित सरपंचानी अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध केला.पुरंदर उपसा योजनेला योग्य नियोजन नसल्यामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत.सध्या उन्हाळा सुरू झाल्याने शेतीच्या पाण्याची मागणी वाढली आहे.
तसेच पूर्वी १९% प्रमाणे पाणीपट्टी भरून मिळणारे पाणी आज शेतकऱ्यांना दुपटीने पैसे भरून पाणी विकत घ्यावे लागत आहे.पाणी चोरीचे प्रमाण वाढले आहे,अधिकारी,कर्मचारी चिरीमिरी घेऊन फुकटात पाणी सोडतात.मध्यंतरी तर एका गावात कर्मचाऱ्यांनी मलिदा घेतल्याने अनेक पाणी चोरांचे फावले होते.योग्य नियोजन नसल्यामुळे पणीचोरांचे फावत आहे.यामुळे मात्र नियमित पैसे भरून पाणी घेणाऱ्या शेतकऱ्यांना पाणी मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
वाघापूर(तालुका पुरंदर)येथील पुरंदर उपसाच्या पंप हाऊस ठिकाणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सरपंचांनी कार्यकारी अभियंत्यांना आठ दिवसापूर्वी मीटिंग आयोजित करण्याचे निवेदन दिले होते.ठरल्याप्रमाणे बुधवार(दिनांक २३)रोजी ठीक अकरा वाजता सर्व सरपंच त्या ठिकाणी उपस्थित राहिले होते.मात्र पंप हाऊसचे गेट बंद होते.अधिकाऱ्यांनी उशिरा उपस्थिती लावली असता पंप हाऊस ठिकाणी असलेल्या मीटिंग हॉलची च्यावी कोणाला सापडत नव्हती.शोध घेता घेता चावी मिळाली.
मीटिंग हॉलमध्ये प्रवेश करता संपूर्ण हॉल मध्ये धूळ, अस्वच्छता,अस्ताव्यस्त पडलेले साहित्य निदर्शनास आले.याबाबत अभियंता लगड यांना विचारले असता खुर्च्यांची व्यवस्था करता का? असा सवाल त्यांनी सरपंचांना केला.यामुळे उपस्थित सरपंचांचा चांगलाच पारा चढला होता.पूर्व कल्पना देऊन देखील अधिकारी वर्गाने मिटिंगचे नियोजन केले नव्हते.
तालुका लोकप्रतिनिधींनी लावलेल्या मितींगचे दोन तास अगोदरच योग्य नियोजन केले जाते मात्र लाभक्षेत्रातील गावोगावच्या सरपंचांनी बोलाविलेल्या मीटिंगला अधिकारीच उशिरा उपस्थिती लावतात.उलट सरपंचांकडूंच मदतीची अपेक्षा करतात.मिटिंगचे योग्य नियोजन अधिकाऱ्यांना करता न आल्याने मीटिंग हॉल मध्ये न घेता पंप हाऊस मध्येच उभे राहूनच सरपंचांना अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांचे घाराने मांडावे लागले.
यामुळे संतापलेल्या सरपंचांनी अधिकारी वर्गाचा निषेध केला.यावेळी उपस्थित सरपंचांनी विविध समस्यांचा पाढा वाचत पाणीपट्टी दरवाढ कमी करण्याची मागणी केली.यावेळी सरपंच हरिदास खेसे,उद्धव भगत,सोमनाथ कणसे,दशरथ लवांडे,दिलीप शेंडकर,महादेव शेंडकर,मनोज कुंजीर,प्रकाश मारणे,गणेश कोलते,दत्ता जाधव,मंगेश गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.
झालेल्या प्रकाराबाबत उपस्थित अधिकाऱ्यांनी सरपंच संघटनेची जाहीर माफी मागितली.