पुणे
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईचे सत्र सुरुच आहे. काल (मंगळवारी) एसीबीच्या पथकाने ३५ हजार रुपयांची लाच मागितली म्हणून एका किवळे (ता.मावळ,जि.पुणे) तलाठी कार्यालयातील मदतनिसाविरुद्ध गुन्हा दाखल केला.दरम्यान, तलाठ्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. त्यामुळे किवळ्याचे तलाठीही गोत्यात येण्याची दाट शक्यता आहे. याबाबत देहूरोड पोलिस ठाण्यात लाचखोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
त्याबाबत एसीबीने फिर्य़ाद दिली आहे. नितीन ढमाले असे या मदतनिसाचे नाव आहे.नितीन ढमाले याने रावेत येथील एका ३३ वर्षाच्या तरुणाकडे त्यांच्या सोसायटीच्या जागेची नोंद सातबारा उताऱ्यावर करून देण्यासाठी ही ३५ हजार रुपयांची लाच मागितली होती. एसीबीचे पीआय संदीप वर्हाडे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.दरम्यान, शासकीय अधिकारी,कर्मचारी,लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास १०६४ या टोल फ्री क्रमाकांवर संपर्क साधण्याचे आवाहन एसीबीचे डीवायएसपी श्रीहरी पाटील यांनी केले आहे.