अकोला
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे रविवारी अकोला जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी मूर्तिजापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठकी घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्याकडुन निधी मिळत नाही.आमदारांनी निधी दिला तर त्यावर कमिशन मागितलं जात असल्याचा गंभीर आरोप केले. त्यामुळे राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळालं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील सदस्य अमोल मिटकरी हे नेहमीच चर्चेत असतात.नुकत्याच विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान विधिमंडळ आवारात आमदारांमध्ये झालेल्या धक्काबुक्की प्रकरणातही ते वादग्रस्त ठरले होते.
आता अकोला जिल्ह्यात त्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी निधीसाठी कमिशन घेत असल्याचा गंभीर आरोप मिटकरींवर करण्यात आला आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापुढे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रारीचा पाढाच वाचल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या सर्व तक्रारी जयंत पाटील यांनी ऐकून घेतल्या आणि त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासनही पदाधिकाऱ्यांना दिले.आमदार अमोल मिटकरी यांनी अकोला जिल्ह्यात आतापर्यंत ५० कोटीचा निधी आणला आहे. त्यातून पक्षाच्या सदस्यांना विकास कामांसाठी निधी दिला नसल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे तर दुसरीकडे जिल्हाध्यक्षांना २० कोटीचा निधी देताना मिटकरी यांनी कमिशन मागितल्याचा आरोपही खुद्द राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहड यांनी केला आहे.दरम्यान, मूर्तिजापूर येथील आढावा बैठकीत मिटकरी यांच्यावर जिल्हा परिषद सदस्यांनी देखील आरोप केले.
दगडपारवा जिल्हा परिषद सर्कलच्या सदस्या सुमनताई गावंडे यांचा मुलगा व राष्ट्रवादीचा पदाधिकारी विशाल गावंडे यांनी देखील आमदारांकडून निधी दिला जात नसल्याची तक्रार केली.मिटकरी यांनी १६ कोटीचा निधी एकट्या कुटासा गावात दिला शिवाय या गावातील स्थानिक स्वराज्य संस्थेत आणि सोसायटीतही राष्ट्रवादीला यश मिळाल्याचे गावंडे यांनी जयंत पाटलांना सांगितलं.