नागपूर
नागपूरच्या सोनेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या उज्वलनगर पेट्रोल पंपावर तीन अज्ञात आरोपींनी दरोडा टाकला. 13 सप्टेंबरच्या रात्री हा धक्कादायक प्रकार घडला. यामध्ये जवळपास दोन लाख 30 हजार रुपयांची लूट करण्यात आली. पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार नागपूरच्या उज्वलनगर चौकातील पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी आपलं काम संपवलं. काही कर्मचारी पैशांचा हिशोब करून ते कपाटात ठेवले. तसेच हे कर्मचारी नंतर जेवण करायला बसले. मात्र, यावेळी जवळपास दोन ते तीन आरोपी तोंडावर कापड बांधून पेट्रोल पंपावर अचानकपणे पोहोचले. त्यांच्या हातामध्ये कुऱ्हाड तसेच चागू अशी धारदार शस्त्रे होती.
या अज्ञात व्यक्तींनी शस्त्राचा धाक दाखवून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. तसेच त्यांच्याकडे शस्त्रे रोखून पैसे कुठे आहेत, असे विचारले. जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे कर्मचाऱ्यांनी पैसे ठेवलेले कपाट दाखवले. त्यानंतर या आरोपींनी पेट्रोल पंपावरील तब्बल 2 लाख 30 हजार रुपयांची लूट केली. सर्व पैसे घेऊन आरोपी फरार झाले.
दम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. उज्वलनगर हा भाग गजबजलेला असतो. साधारणतः रात्रीच्या वेळीसुद्धा या रोडवर रहदारी असते. मात्र, लोकांची रेलचेल असूनदेखील ही लूट झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या घटनेमुळे नागपुरात गुन्हेगारी बोकाळली आहे, असा आरोप केला जातोय. या घटनेनंतर पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करत आहेत.