औरंगाबाद
एक लक्षात ठेवा, सगळ्यात भामटा माणूस असेल तर तो ग्रामसेवक आहे. तो तुम्हाला कधी मूर्ख बनवेल, हे सांगता येत नाही. तो तुमचे ऐकतो असे दाखवेल, पण बाहेर गेल्यावर सरपंचांच्या सांगण्यावरून केले असे सांगत स्वतःच्या अंगावर काही येऊ देत नाही. त्यामुळे महिला सरपंचांनी त्यांच्यापासून दूर राहावे, असा सल्ला आमदार शिरसाट यांनी सोमवारी (दि.८) आयोजित सरपंच परिषदेत महिला सरपंचांना दिला. मात्र त्यांचे हे वक्तव्य त्यांच्याच अंगलट आले आहे. राज्यभरातील ग्रामसेवकांकडून याचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.
सोमवारी शहरात झालेल्या महिला सरपंच परिषदेत बोलताना शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी हे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. मात्र यानंतर राज्यभरातील ग्रामसेवकांमध्ये वादंग उडाले आहे.
मंगळवारी (दि.९) राज्यभरातील ग्रामसेवकांनी एक दिवसीय काम बंद आंदोलन पुकारले. तसेच आमदार संजय शिरसाट यांनी समस्त ग्रामसेवक वर्गाची माफी मागावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.
ग्रामसेवकांबद्दल गैरसमज निर्माण करणारे वक्तव्य केल्याबद्दल शिरसाट यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही ग्रामसेवकांच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, तहसील कार्यालयात २७ हजार ५३६ ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प झालेले आहे.
त्यांनी विनाशर्त माफी मागावी.
मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करून आमदारांना सक्त ताकीद द्यावी. ग्रामसेवकांबद्दल समाजात गैरसमज निर्माण करणारे वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जावा, अशी मागणी महाराष्ट्र ग्रामसेवक युनियनने केली आहे. आपल्या आलेल्या अनुभवांवरून आपण हे वक्तव्य केल्याचे सांगत शिरसाट यांनी याप्रकरणी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.