पुणे
तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीच्या ऐतिहासिक होळकर तलावात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. व्यक्तीच्या डोक्यात गंभीर जखमा तसेच गळ्याला शाल बांधलेली, हात पाय बांधून या व्यक्तीला तलावात टाकून देवून खून झाल्याचे जेजुरी पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.
याबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ११२ क्रमांकावर अज्ञात व्यक्तीने जेजुरीच्या होळकर तलावात एका इसमाचे प्रेत तरंगत असल्याची माहिती दिली.जेजुरी पोलिसांनी तत्काळ होळकर तलावावर जावून पाण्यातील एका अज्ञात व्यक्तीने प्रेत बाहेर काढले.
व्यक्तीच्या डोक्यात गंभीर जखमा तसेच या व्यक्तीचे हात पाय बांधलेले व गळ्याला शाल ने गाठी मारलेल्या आढळून आले. अज्ञात कारणासाठी मारहाण करून तलावात फेकून या व्यक्तीचा खून केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. खून झालेल्या व्यक्तीचे वय ३५ ते ४० असून अंगात पँट शर्ट, मोठी दाढी, डोक्याला विरळ केस आहेत.
या व्यक्तीच्या डाव्या मानेवर ३०२, उजव्या माने वर श्री, तसेच एका हातावर “शिवण्या” ही अक्षरे गोंदलेली आहेत. याप्रकरणी आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथके रवाना झाली असून जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, नामदेव तारडे, सहाय्यक फौजदार नंदकुमार पिंगळे, गणेश नांदे, दशरथ पुजारी तपास करीत आहेत.